मुंबई दि. 12 :शरद पवार यांनी कृषी आणि सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम पाहता त्यांच्यातील दूरदृष्टीचे दर्शन होते. राजकारणात येणाऱ्या ...
मुंबई दि. 12 :शरद पवार यांनी कृषी आणि सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम पाहता त्यांच्यातील दूरदृष्टीचे दर्शन होते. राजकारणात येणाऱ्या तरुणांना शरद पवार यांनी कृषी आणि सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात केलेले काम निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शरद पवारांचा गौरव केला.
मुंबईतील नेहरु सेंटर येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पावर यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल यांनी श्री. पवार यांच्याविषयीचे कौतुकोदगार काढले. शरद पवार कृतज्ञता विशेष कार्यक्रमात यावेळी आधारवड या शरद पवारांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन राज्यपालांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या काय्रक्रमाला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार सुनील तटकरे, रिलायन्स उदयोग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, बजाज उद्योगसमुहाचे राहुल बजाज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मा.राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले की, श्री. पवार यांनी जेव्हा जेव्हा देशावर किंवा राज्यावर आपत्ती ओढवली तेव्हा तेव्हा दाखवलेली समयसूचकता आणि धीरोदत्तपणा हा महत्वाचा होता. श्री. पवारांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वात त्यांचे कुटुंबिय, त्यांचे आई-वडील, त्यांच्या पत्नी यांचा मोलाचा सहभाग आहे. श्री. पवार यांनी सर्वांशी आपुलकीचे, मैत्रीचे, प्रेमाचे नाते निर्माण केले आहे. गेल्या चार दशकात त्यांनी केलेला राजकीय प्रवास आणि या प्रवासातील धीरोदत्तपणा निश्चितच शिकण्यासारखा आहे.
सिक्कीमचे मा. राज्यपाल श्रीनिवास पाटील यावेळी म्हणाले की शरदचंद्र पवार यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला ते दिशा देण्याचे काम करीत असतात. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून त्यांनी बजाविलेल्या भूमिका महत्वाची आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी आहे.
या कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, आज या कार्यक्रमात "आधारवड" हे पुस्तक प्रकाशित होत आहे. खरे तर श्री. पवार यांनी आपल्या कार्यातून, मैत्रीतून अनेकांना आधार दिला आहे. आपल्या कामाने अनेकांशी प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. सामान्य कार्यकर्त्यालाही ते नावाने ओळखतात, याचा अनुभव मी स्वत: घेतला असल्याचे श्री. खडसे यांनी यावेळी सांगितले. श्री. पवार हे आगळेवेगळे व्यक्तीमत्व असून महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचेही श्री. खडसे यावेळी म्हणाले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यावेळी म्हणाले की, शरद पवार आणि माझी पन्नास वर्षाची मैत्री आहे. राजकीय कारर्किदीत त्यांनी अनेकांना घडविले. प्रत्येक व्यक्तीशी कसा संवाद साधायचा हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, श्री. पवार यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत वाखणण्यासारखी आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीचा इथपर्यंतचा प्रवास हा कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाणे आणि अभ्यासुवृत्ती हे गुण पवारांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचा सारखा नेते आपल्या महाराष्ट्रात जन्मला हे महाराष्ट्राचे थोर नशीब आहे.
श्री. पवार या कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, मी महाराष्ट्राच्या जनतेच्या आभारी आहे. कारण याच महाराष्ट्राच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले. या पुढेही त्यांच्या ऋणात राहणे मला आवडेल. हा लोकशाहीचा चमत्कार म्हणावा लागेल की सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मी आज इथपर्यंत पोहचू शकलो. या पुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आपल्याकडून सुरू राहील, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उद्योजक राहुल बजाज, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, डॉ. जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, क्रिकेटपट्टू चंदू बोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.










