कोलकाता: झोपेत बस चालविणाऱ्या चालकाने उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानाला धडक दिल्याने विमानाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र...


कोलकाता: झोपेत बस चालविणाऱ्या चालकाने उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानाला धडक दिल्याने विमानाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र बस अथवा विमानात प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एअर इंडियाचे आसाममधील सिलचर येथे जाण्याच्या तयारीत असलेले विमान बे क्र. ३२ वर उभे असताना रात्रपाळीमध्ये काम करणारा जेट एअरवेजचा बस चालक मोमीन अली आपली बस घेऊन आला. तो झोपेत असल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी बस त्या विमानाच्या डाव्या बाजूच्या पंखाजवळ धडकली.
या प्रकाराबाबत प्राथमिक चौकशी केली असता अली याने कबुली दिली असून त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे; असे विमानतळ संचालक ए के शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश नागरी उड्डयन विभागाच्या महासंचालक कार्यालयाने दिला आहे.









