पुणे - राज्य सरकारने "क‘ आणि "ड‘ संवर्गातील नोकरभरतीवरील बंदी शिथिल केल्याने सुमारे वीस हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आह...
पुणे - राज्य सरकारने "क‘ आणि "ड‘ संवर्गातील नोकरभरतीवरील बंदी शिथिल केल्याने सुमारे वीस हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी जलसंपदा, कृषी, सहकार, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांची प्रक्रिया बुधवारपासून (ता.4) सुरू होत आहे.
खर्चात काटकसर करण्यासाठी राज्य सरकारने विविध खात्यांमधील "क‘ आणि "ड‘ या संवर्गातील नोकरभरतीवर बंदी घातली होती. मात्र, अनेक जागा रिक्त असल्याने सरकारी कामकाजावर त्याचा परिणाम होत होता. या जागा तातडीने भरण्यात याव्यात, यासाठी विविध विभागांमार्फत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने काही अटींवर अत्यावश्यक असणाऱ्या जागा भरण्याची परवानगी दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे रिक्त असणाऱ्या जागा भरतीमधील अडचणी दूर झाल्या असून, विविध विभागांच्या तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक जागा या महिन्यात भरण्यात येणार आहेत. या भरतीबाबतच्या जाहिराती त्या-त्या विभागाने गेल्या दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या अडचणीतून या भरतीप्रक्रियेची मुक्तता झाली आहे.
या भरतीत जलसंपदा खात्यातील सर्वाधिक 5 हजार 900 जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या पंधरा वर्षांतील ही सर्वांत मोठी नोकरभरती ठरणार आहे. शून्य अर्थसंकल्पानंतर या खात्यात "क‘ आणि "ड‘ वर्गात भरतीच झालेली नव्हती. या परीक्षेसाठी 5 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार असून, 25 जानेवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्या-त्या जिल्ह्यात ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे जलसंपदा विभागाचे सचिव सी. एस. मोडक यांनी "सकाळ‘शी बोलताना सांगितले.
‘कृषी विभागातील कृषीसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा 935 जागा भरण्यात येणार आहेत. विभागाने त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे खास प्रस्ताव दाखल केला होता. या भरतीसाठी फक्त लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. त्यामुळे भरतीप्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे तक्रारींनाही वाव राहणार नाही,‘‘ कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.
सहकार विभागातील भरतीलाही सरकारने परवानगी दिली असून, त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या विभागाच्या सुमारे 500 जागा भरण्यात येणार असल्याचे या विभागाचे अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी सांगितले. अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी नोकरभरती असल्याने तरुणांच्या आशा उंचावल्या आहेत. इच्छूकांनी www.wrdrecruitmentpune.com आणि http://ese.mah.nic.in या दोन्ही संकेतस्थळांवर संपर्क साधावा.









