नगर- साधू-संत हे समाज सुधारणेचे काम करत असतात. लोकांचा त्रास सहन करीत आपले काम करण्यामध्ये ते गर्क राहतात. माझ्या कारकिर्दीत गडाचा 1 टक्...
नगर- साधू-संत हे समाज सुधारणेचे काम करत असतात. लोकांचा त्रास सहन करीत आपले काम करण्यामध्ये ते गर्क राहतात. माझ्या कारकिर्दीत गडाचा 1 टक्का सुद्धा विकास मी केला नाही. मात्र बाबांच्या नावाने येणारा पैसा प्रामाणिकपणे गडासाठीच वापरतो. भगवानगड हा साधू-संतांचाच आहे आणि राहणार. किर्तनाशिवाय कोणाचाच आवाज येथे निघणार नाही, असे प्रतिपादन भगवान गडाचे डॉ.न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी केले.
नगर येथे मार्केट यार्डमध्ये सारसनगरात भगवान बाबा मंदिरात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले होते. त्याची सांगता नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी आपल्या किर्तनातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील कार्याचा आढावा घेतला. काला हा वैष्णवांसाठी दिला जातो, त्याचे महत्व सांगितले. भगवानबाबा यांच्या जीवनातील चांगले-वाईट प्रसंगांची माहिती देत भगवानगडावर ज्ञानोबारायांचे मंदिर बांधण्याची इच्छा असून, ती पूर्ण करण्याची ताकद भगवानबाबा देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुमारे 5 हजार स्त्री-पुरुष भाविकांनी नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेतले. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, लोहसरचे सरपंच अनिल गिते, बाबासाहेब सानप, दादासाहेब मुंडे, सूर्यभान पोटे, सुधीर पोटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी महाराजांचे आशिर्वाद घेतले. काल्याचे किर्तनानंतर हभप रामगिरी महाराज यांचे हस्ते काला फोडण्यात आला. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताह यशस्वीतेसाठी श्री संत भगवानबाबा सेवा भावी प्रतिष्ठान (ट्रस्ट) व सर्व भक्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या सर्वांचे भगवान ढाकणे, बबन घुले, म्हातारदेव घुले, पाराजी ढाकणे, दिलीप घुले यांनी आभार मानले.









