पारनेर :(तालुका प्रतिनिधी) पारनेर तालुक्यात ‘महावितरण’ कडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रोहित्रे जळाल्यानंतर दुरूस्ती व वाटपात होणारा दुजाभ...
पारनेर :(तालुका प्रतिनिधी) पारनेर तालुक्यात ‘महावितरण’ कडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रोहित्रे जळाल्यानंतर दुरूस्ती व वाटपात होणारा दुजाभाव, दूधभाववाढ, दुष्काळी गावांमध्ये अनेक गावे वंचित राहिल्याने त्याचे फेरसर्व्हेक्षण करावे, दरोडे, चोऱ्यांचा तपास लावावा यासह इतर विविध प्रश्नी पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
राष्ट्रवादीचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील महात्मा फुले चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. लाल चौक, मुख्य शिवाजी पेठ मार्गे मोर्चा पारनेर तहसीलवर धडकला. मोर्चात दुधाचे भाव वाढवा, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा, सबका साथ सबका विकास, शेतकरी केला भकास असे फलक झळकले. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या.
पारनेर तालुक्यात वीजप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी स्थितीत अनेक गावांची पीकआणेवारी जास्त लागल्याने ते दुष्काळी सवलतींपासून वंचित आहेत, असे झावरे यांनी निदर्शनास आणून दिले. अशोक सावंत, संजीव भोर यांनीही वाळुचोरांवर कारवाई करताना पोलीस व तहसीलकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. यावेळी सबाजी गायकवाड, अशोक सावंत, सभापती अरूण ठाणगे, उपसभापती भाऊ लामखडे, सोन्याबापू भापकर, प्रशांत गायकवाड, पोपट पवार, दीपक नाईक, विलास मते, योगेश मते, विक्रमसिंह कळमकर, पोपट शेटे, बबलू रोहोकले, संदीप कपाळे आदी उपस्थित होते.









