मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायन क्षेत्रातील कारकीर्द आता चांगलीच बहरल्याचे दिसत आहे. ‘संघर्षयात्रा’ या मर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायन क्षेत्रातील कारकीर्द आता चांगलीच बहरल्याचे दिसत आहे. ‘संघर्षयात्रा’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी थेट बॉलीवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन करण्यापर्यंत मजल मारली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ आणि कुणाल कोहलीच्या ‘फिर से’ या चित्रपटांमधून अमृता फडणवीस यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ‘जय गंगाजल’मधील ‘सब धन माती’ या गाण्याला अमृता यांनी आपला स्वरसाज चढवला आहे. ‘सब धान माती’ हे गीत मनोज मंताशिर यांनी लिहिले आहे. गेल्याच महिन्यात या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले होते. अमृता यांनी गायलेले हे गाणे चित्रपटातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अमृता यांच्या मधूर आवाजामुळे हे गाणे खूपच सुंदर रेकॉर्ड झाले असून या गाण्याला उच्च दर्जा प्राप्त झाल्याची भावना प्रकाश झा यांनी व्यक्त केली. ‘जय गंगाजल’ हा चित्रपट २००३ साली आलेल्या ‘गंगाजल’चा सिक्वेल आहे. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अमृता यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्रा’ या मराठी चित्रपटासाठी शीर्षकगीत गायले होते.









