कोट ः - काल मला धमकी देण्याचा प्रकार खरा आहे. पोलिसांनी समाधानकारक बंदोबस्त दिला आहे. पुण्यतिथी सोहळ्याचे निमंत्रण कोणत्याही...
कोट ः -काल मला धमकी देण्याचा प्रकार खरा आहे. पोलिसांनी समाधानकारक बंदोबस्त दिला आहे. पुण्यतिथी सोहळ्याचे निमंत्रण कोणत्याही व्हीआयपी व्यक्तींना दिले नसून पुढील काळातही दिले जाणार नाही; मात्र, कोणी आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल. - डॉ. नामदेवशास्त्री, महंत, भगवानगड
पाथर्डी (वृत्तसेवा) - भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांना एका जणाने मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिस प्रशासनाने भगवानगडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून नामदेवशास्त्री यांना संरक्षण दिले आहे. येत्या रविवारी (२४ जानेवारी) भगवानगडावर पुण्यतिथी सोहळा होणार असून त्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांनी आज न्यायालयाकडे अर्ज करत प्राप्त केले असून नामदेवशास्त्रींना जो मोबाइल आला त्याचे लोकेशन बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील टॉवरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, नामदेवशास्त्री यांना गुरुवारी ९४२३७६२७६५ या मोबाइल क्रमांकावरून नऊ ते दहा वेळा कॉल आले; मात्र, हा क्रमांक परीचयाचा नसल्याने सुरुवातीला नामदेवशास्त्री यांनी हा कॉल उचलला नाही; मात्र, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परत कॉल आल्यानंतर त्यांनी तो उचलला असता संबंधित व्यक्तीने, 'ताईला आणायला विरोध केला, तुम्ही आमच्यामध्ये भांडणे लावता काय', असे म्हणत नामदेवशास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या नंतर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नामदेवशास्त्री यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला एक तक्रार अर्ज देऊन आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवत संरक्षण देण्याची मागणी केली. पोलिसांनी या अर्जावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून शुक्रवारी न्यायालयाकडे या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश मिळण्याची मागणी केली. न्यायालयाने परवानगी दिली आहे.
भगवानगडवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून सध्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व नामदेवशास्त्री यांच्यात शीतयुद्ध सुरू असून दसरा मेळावा होणार नसल्याची भूमिका नामदेवशास्त्री यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया मुंडे समर्थकांमध्ये उमटून त्यांनी या निर्णयाला विरोध केल्याने सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी भगवानगडावर पुण्यतिथी सोहळा होणार असतानाच हा प्रकार घडल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन उपविभागीय पोलिस अधीक्षक दत्तात्रय कांबळे यांनी शुक्रवारी गडावर नामदेवशास्त्रींची भेट घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करून त्यांना संरक्षण दिले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रेवन्नाथ रांजणे करीत आहेत.
|









