कर्जत : (तालुका प्रतिनिधी) कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रश्नी कर्जत तालुका काँग्रेस तसेच चिंचोली काळदात येथील ग्रामस्था...
कर्जत : (तालुका प्रतिनिधी) कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच इतर प्रश्नी कर्जत तालुका काँग्रेस तसेच चिंचोली काळदात येथील ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर सुरू करावा, या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, जनावरांना चारा, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी, कमांडची अट रद्द करावी, पाण्याचा टँकर मिळावा, प्रत्यक्ष पहाणी करून आणेवारी जाहीर करावी, कर्जत बसस्थानक परिसर स्वच्छ करावा, शालेय संगणक फी रद्द करावी. टँकर घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी कर्जत तालुका काँग्रेस समितीने उपोषण सुरू केले आहे. उपोषणास तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपसभापती प्रकाश शिंदे, पं.स. सदस्य किरण पाटील, युवा नेते संतोष धुमाळ, ‘त्रिमूर्ती’चे अध्यक्ष महेंद्र गुंड, सतिष पाटील, तात्यासाहेब ढेरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रीक, बापूसाहेब काळदाते आदी सहभागी झाले आहेत.चिंचोली काळदात येथे टँकर मंजूर करावा यासाठी उपसरपंच रघुनाथ काळदाते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणास बसलेल्यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. हंडे घेऊन महिला या उपोषणात सहभागी झाल्या आहेत.









