श्रीरामपूर - कामकाज बंद पडूनही फक्त कागदांवर अस्तित्व असलेल्या नामधारी कागदी सहकारी संस्थांना टाळे ठोकून सहकाराचे शुद्धीकरण करण्याची म...
श्रीरामपूर - कामकाज बंद पडूनही फक्त कागदांवर अस्तित्व असलेल्या नामधारी कागदी सहकारी संस्थांना टाळे ठोकून सहकाराचे शुद्धीकरण करण्याची मोहीम सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांनी श्रीरामपूर तालुक्यातील ४0 संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांना कायमचे टाळे ठोकले आहे.
आतापर्यंत निव्वळ सहकार खात्याच्या फाईलींमध्येच या संस्थांचे नावापुरते अस्तित्व होते. प्रत्यक्षात या संस्थांचे कोणतेही कामकाज सुरू नव्हते. त्यामुळे सहकार कायदे, अधिनियम व तरतुदींना हरताळ फासला जात होता पण संस्थांचे अस्तित्व कायम राहत होते. त्यामुळे कागदोपत्री फाईलींमध्ये अशा सहकारी संस्थांची आकडेवारी मोठी दिसत होती. दळवी यांनी सहकार आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून 'झिरो पेन्डन्सी'च्या माध्यमातून त्यांनी सहकार विभागाच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील बंद पडलेल्या ८0 सहकारी संस्था यापूर्वीच अवसायानात काढण्यात आल्या आहेत.
नोंदणी रद्द केलेल्या ग्रामीण संस्थांची नावे : सुयोग सहकारी भाडेकरू गृहनिर्माण, मालुंजे लाडगाव शेतकरी विकास सेवा संस्था मालुंजे, उंबरगावची अंकुर सहकारी गृहनिर्माण, टाकळीभानची संत चोखोबा मागास गृहनिर्माण, बेलापूरची विनय सहकारी भाडेकरू मागासवर्गीय गृहनिर्माण, रामपूरची सद्गुरू गंगागिरी भाडेकरू गृहनिर्माण, मुठेवाडगावची यशोदा ग्रामीण बेरोजगार सेवा संस्था, दत्तनगरची माँ अनंतेश्वरी स्वयंरोजगार संस्था, साईबाबा स्वयंरोजगार संस्था, भैरवनाथनगरची छत्रपती शेतकरी विकास संस्था, गोंधवणीची संत जनार्दन स्वामी गृहनिर्माण, बेलापूरची अभिषेक संगणक सेवा सहकारी संस्था.
श्रीरामपूर शहरातील संस्था : प्रगत महिला औद्योगिक संस्था, कल्पना सहकारी भाडेकरू मागासवर्गीय गृहनिर्माण, आराधना मागास सहकारी भाडेकरू गृहनिर्माण, श्रीरामपूर सहकारी भाडेकरू गृहनिर्माण, तुळजाभवानी स्वयंरोजगार संस्था, जयश्री महिला औद्योगिक संस्था, एकता मजूर सहकारी, जिजामाता महिला मोलकरीन सहकारी, श्रीरामपूर तालुका लेखापरीक्षक सहकारी, संजीवन सौर ऊर्जा उद्योग सेवा सहकारी, विश्वेश्वरनाथ महाराज गृहनिर्माण, जिजामाता महिला औद्योगिक, श्रीरामपूर मध्यवर्ती महिला ग्राहक संस्था, क्रांतिज्योती महिला औद्योगिक, विवेकानंद गृहनिर्माण, एम्सपॉवर स्वयंरोजगार, श्रीरामपूर शहर रिक्षा चालक मालक, श्रीरामपूर तालुका नागरिक सेवा, माथाडी कामगार मजूर, नवनाथ मजूर, विजय गृहनिर्माण, लोककिमया स्वयंरोजगार सहकारी संस्था.










