राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छता राहील यासाठी नेहमी सातत्य ठेवले असून याही वर्षी या पालिकेस स्वच्छ महा...

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छता राहील यासाठी नेहमी सातत्य ठेवले असून याही वर्षी या पालिकेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे 1 कोटी रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले असून या बक्षिसाचे वितरण नुकतेच मुंबई येथे करण्यात आले. देवळाली पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा ज्योतीबाई त्रिभुवन, उपनगराध्यक्ष ज्योतीताई गिरमे, मुख्याधिकारी विनोद जळक आदिंसह नगरसेवकांनी या बक्षिसाचा स्विकार केला.
एकीकडे शहरे गलिच्छ होत असताना देवळालीप्रवरा नगरपरिषदेने वेळोवेळी स्वच्छता अभियानात मदत सहभाग घेवून नागरीक-कामगारांच्या मदतीने शहरात स्वच्छता अभियान राबवून अनेक बक्षिसे मिळविले आहेत. सर्व प्रथम 2002 मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा पंडीत नेहरु नागरी स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून 25 लाखांचे बक्षिस पटकावले होते. यावेळी संपूर्ण स्वच्छ तसेच घनकचरा व्यवस्थापन राबविण्यात ही पालिका यशस्वी ठरली होती. पालिकेने कचऱ्याची समस्या लक्षात घेता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाविण्यपुर्ण उपक्रम पालिकेने राबविले आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात खाजगी लोकांचा सहभाग करुन घेत त्यांच्या मदतीने स्वच्छतेविषयीची प्रसिध्द करुन घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना या मोहीमेत सहभागी करुन घेण्यासाठी त्यांना स्वच्छतादूत म्हणून बक्षिसे जाहीर करण्यात आली. कचरा विका व पैसा कमवा आदी उपक्रम राबवून कचऱ्यापासून खत निर्मिती केली. तसेच पालिकेने चिंतामणी अमरधाममध्ये सुंदर बगीचा उभारला. पालिकेने पाणी अडवा पाणी जिरवा व त्यातून अनेक बंधारेही बांधले. शहरासह वाड्या वस्त्यांवर स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सौरदिवे ओला, सुका कचरा वेगळा करुन घंटागाडीतून वाहून नेण्याची व्यवस्था केली व या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांची यशस्वी अंमलबजावणी केल्याने या अभियानाअंतर्गत या पालिकेला नुकताच स्वच्छ पालिकेचा बहुमान मिळाला आहे. मुंबई येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे 1 कोटी रुपयांचा पुरस्कार दिला गेला. यावेळी सदर पुरस्कार नगराध्यक्षा ज्योतीताई त्रिभुवन, उपनगराध्यक्षा ज्योतीताई गिरमे, मुख्याधिकारी विनोद जळक, नगरसेविका इंदुमती खांदे, प्रमिला कोळसे, चंद्रकला ढुस, बेबीताई बर्डे आदींनी स्विकारला.









