मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा वृध्दापकाळ चांगला जावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65...
मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा वृध्दापकाळ चांगला जावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षे करण्यात येणार असून त्यासाठी धोरणात बदल करुन ज्येष्ठ नागरिकांनी अनेक सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात मंत्रालयात एक खास बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा लाभ आणखी 19 लाख ज्येष्ठांना मिळेल, तर राज्याच्या तिजोरीवर 650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
2013 साली तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्य़ादा 65 ऐवजी 60 करण्याचे धोरण जाहीर केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करणे त्या सरकारच्या कार्य़काळात शक्य झाले नाही आणि हा विषय मागे पडला होता. मात्र राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यावर सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी या प्रश्नाचा सतत पाठपुरावा केला.
सध्या राज्यात 65 वर्षावरील 46.40 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. सरकारने ही वयोमर्य़ादा 60 वर्षांवर आणली तर राज्यातील आणखी 18.88 लाख ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होईल. सध्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.प्रवास भाड्यात सवलत तसेच श्रावणबाळ निवृत्ती योजनेतून 600 रु. अशा सुविधा दिल्या जातात. मात्र आता ज्येष्ठांच्या धोरणामध्ये बदल करुन आणखी नव्या सोयी-सुविधांची भर टाकली जाणार आहे. रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारावरील औषधे मोफत उपलब्ध करुन देणे आदि सुविधांचा नव्या धोरणात समावेश कऱण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी सांगितले. ज्येष्ठांची वयोमर्य़ादा 60 वर्षे केल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीवर 650 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.










