पारनेर- पारनेरचे माजी आमदार वसंतराव कृष्णराव झावरे पाटील यांचे गुरुवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वा. दीर्घकालीन आजाराने न...
पारनेर- पारनेरचे माजी आमदार वसंतराव कृष्णराव झावरे पाटील यांचे गुरुवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वा. दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या पश्चात बंधू प्रतापराव पाटील, पुत्र सुजित, सुदेश व मुलगी सूचेता, पत्नी सुप्रिया असा परिवार आहे.
वसंतराव झावरे पारनेरच्या राजकारणात सन 1978 पासून सक्रिय होते. राजकारणात ते शरद पवार यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात होते. 1978 पूर्वी भूविकास बँकेमध्ये त्यांनी मॅनेजर म्हणून काम केले. पारनेर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या माध्यमातून स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्यासाठी झावरे यांनी प्रभावीपणे काम केले. दुष्काळी पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोरवाडी धरण पाणी परिषद, कान्हूरपठार पाणी परिषदांचे नेतृत्व केले होते. एक सर्वसामान्यांचा कार्यकर्ता, निष्कलंक राजकारणी, गोरगरिबांचा तारणहार म्हणूनच त्यांची पारनेर तालुक्यात वेगळी ओळख होती. आमदार अरुण जगताप ह्यांचे ते व्याही होते. त्यांच्या निधनानंतर पारनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










