माणसाच्या आयुष्यात प्रत्येक घटना ठरवूनच होते असे नाही. अनेक घटना या अगंतूक असतात, तशाच अनहूत देखील असतात. त्यातल्या काही टाळता येतात...
माणसाच्या आयुष्यात प्रत्येक घटना ठरवूनच होते असे नाही. अनेक घटना या अगंतूक असतात, तशाच अनहूत देखील असतात. त्यातल्या काही टाळता येतात तर काही टाळाव्या म्हटलं तरी शक्य नसते. मात्र काही घटना आपल्यासोबत घडणार आणि घडल्या तर कशा घडणार याची जाणीवच होत नसते. हे झालं सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत. मात्र पदसिध्द, ज्ञानवंत, विचारवंत तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रतिष्ठाप्राप्त आणि समाजघटकांना जबाबदार असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना जागृतच रहावे लागते. नव्हे, समयोचित भानही ठेवावे लागते. काही वेळा ते ठेवण्याची संधी मिळत नाही हे देखील वास्तव आहेच. असाच काहीसा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांचेसोबत घडला. पुणे येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. या वर्धापन दिन समारंभात गुरुवानंद स्वामी यांना 'सुर्यरत्न-आधुनिक युगाचे संत' असा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सत्यव्रत शास्त्री, माजी न्यायाधीश पी.बी.सावंत, संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ शास्त्रीय गायक, सजन आणि साजन मिश्री, डिझायनर दिलीप छाब्रीया, दूरचित्रवाणीवरील पत्रकार डॉली ठाकोर, गायक उदित नारायण, व्यावसायिक मोतिलाल ओसवाल, यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. याचवेळी बँकींग क्षेत्रातील सेवेबद्दल अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा असलेल्या अमृता फडणवीस यांचाही गौरव पुरस्कार देण्यात आला. याचेवळी बँकींग क्षेत्रातील सेवेबद्दल अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा असलेल्या अमृता फडणवीस यांचाही गौरव करण्यात आला. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांना पुरस्कार देण्यात आले. येथपर्यंत जे घडले ते लक्षणीय व उल्लेखनीय असेच होते. मात्र यानंतर पुरस्कारप्राप्त काहींनी गुरुवानंद स्वामींना नमस्कार करुन आशीर्वाद घेतला. प्रत्युत्तरादाखल स्वामींनी नमस्कार करणारांना हवेतून खडा, मणी असे प्रसाद म्हणून काढून दिले. दरम्यान या कार्यक्रमात धार्मिक गुरुंचे भक्तही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या भक्तांकडून बाबाजीकी जय हो अशा घोषणाही दिल्या जात होत्या. अमृता फडणवीस यांनी उपस्थितांच्या आग्रहावरुन । अच्युतम केशवम् कृष्ण दामोधरम् । हे भजन सादर केले. आणि गुरुवानंदांना नमस्कार केला. स्वामींनीही त्यांना हवेतून साखळी काढून दिली. भक्तांनीही पुन्हा जयघोष केला. महाराष्ट्र शासनाने अंधश्रध्दा विषयक केलेला कायदा सर्वश्रृत आहेच. शिवाय बुवाबाजी, हवेतून वस्तू काढून देणे आदि गोष्टीही कायद्याने बाधित केल्या आहेत. असे असतांना, सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या साक्षीने हे सगळे घडले हाच बातमीचा विषय झाला. जो वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमांनी प्रसृत केला. वस्तुतः संस्थेच्या अध्यक्षांनाही बाबाजी असं काही करतील याची कल्पना नव्हती असे वाटते. त्यांचा कार्यक्रम म्हणजे वर्धापनदिन साजरा करणे आणि समितीने निवडलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानीत करणे असा असावा. पुरस्कारार्थी यांची भुमिका म्हणजे कार्यक्रमास उपस्थिती आणि सन्मान स्विकारणे अशी मर्यादित असावी. दरम्यान ज्या बाबाजी म्हणजे गुरुवानंद स्वामींना सुर्यरत्न-आधुनिक युगाचे संत हा सन्मान दिला गेला त्यांना नमस्कार करणे हे समयोचित औचित्य होते. पण हवेतून वस्तू काढून देणे आणि अनहूतपणे ते स्विकारावे लागणे हा प्रकार म्हणजे टाळावं की टाळू नये याचा विचार करण्याची संधी न मिळणे असाच तो प्रकार होता. हवेतून वस्तू काढून देणे ही बुवाबाजी मानली, तरी ज्यांनी त्या वस्तू प्रसाद म्हणून स्विकरल्या त्या व्यक्ती सदर बुवाबाजीच्या अनहूत बळी ठरल्या, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. शनिशिंगणापूरच्या निमित्ताने महिलांना चौथऱ्यावर प्रवेश हा मुद्दा गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक चौथऱ्यावर जाऊन दर्शन घ्यावे अशी मागणी पुढे आली होती. त्या बातमीचा अन्वयार्थ एवढाच होता की, परंपरागत असणारी अंधश्रध्देची पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांना चौथऱ्यावरील प्रवेश बंदीची पध्दत मोडीत काढली जावी, ही मागणीकर्त्यांची इच्छा होती. हवेतून वस्तू काढून देणे हे ज्या अंधश्रध्देच्या पार्श्वभूमीवर ठरविण्यात आले त्याच पध्दतीने वस्तू स्विकारणाऱ्या अमृता फडणवीस, मुख्यमंत्र्यासह चौथऱ्यावर प्रवेश करु शकतील का? असा प्रश्न आता एखाद्याच्या मनात डोकावला तर नवल वाटायला नको, अमृता फडणवीस ज्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यावरच शनिशिंगणापूर प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी होतेय, हे खरं असलं तरी ग्रामसभेच्या ठरावानुसार मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करता येईल का? हा प्रश्नच आहे. दरम्यान बाबाजी ज्येष्ठ म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि प्रसाद म्हणून दिलेली साखळी स्विकारली, पण माझा अंधश्रध्देवरती किंवा बुवाबाजीवरती विश्वास नाही अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. तरीसुध्दा अमृता फडणवीस यांच्यामुळे बुवाबाजीस प्रोत्साहन मिळाले असा जर तर्क कोणी काढला तर अशा वस्तू स्विकारणाऱ्या इतरांचाही विचार करावा लागेल. बाबाजींना थांबविणे कोणालाही शक्य झाले नाही कारण ते सर्वच तथाकथित बुवाबाजीचे अनहूत बळी होते हेच खरे.










