अहमदनगर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची प्रेरणा देत असतात....
अहमदनगर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची प्रेरणा देत असतात. स्काऊट व गाईड्स चळवळ विविध उपक्रमांतून राष्ट्रसेवेचे संस्कार मुलांमध्ये रुजवत आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्तीला अतिशय महत्व असून ती शिस्त या चळवळीतून मिळते, असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, विश्वस्त रमेश जंगले, सरपंच सुजित कोके, किसनराव लोटके, स्काऊट गाईड्सचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, काशिनाथ बुचुडे, कैलास मोहिते, प्रा.उत्तमराव राजळे, आर.व्ही.पगारे, संगिता लांडगे, संगीता रासकर, बी.बी.भोसले, अनिता शिंदे, जी.जे.भोर आदि उपस्थित होते. यावेळी स्काऊट व गाईड्स अहमदनगर कार्यालयाच्यावतीने रत्नाकर पगारे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर श्रीहरी दवंगे, संगिता रासकर, विजय चव्हाण, मंदा शिंदे, उत्तमराव राजळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्काऊट व गाईड्सच्या पुढील वर्षी नगरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याचे स्वागताध्यक्ष स्वीकारुन यजमान म्हणून काम करण्याची तयारी असल्याचे सांगत खा.गांधी यांनी राज्यव्यारी मेळाव्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रारंभी जिल्हा चिटणीस शरद दळवी यांनी प्रास्ताविक करतांना चार दिवस मेळाव्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष केळकर म्हणाले, मेहेरबाबांनी प्रत्येकाला चारित्र्य जपण्याची शिकवण दिली. चारित्र्यवान मनुष्यच राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतो. त्यांची हिच शिकवण स्काऊट व गाईडस् चळवळीतून विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहे. या चळवळीच्या पुढील वर्षी होणाऱ्या राज्यव्यापी मेळाव्यास मेहेरबाबा ट्रस्ट निश्चितच सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. मेळाव्या्तील विविध स्पर्धा तसेच उपक्रमांमध्ये सहभागी होवून बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थी तसेच शाळांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. हिवरेबाजार जिल्हा परिषद शाळेने या मेळाव्यातील जनरल चॅम्पियनशिप पटकावली. समारोपाच्या आदल्या रात्री झालेल्या मुख्य शेकोटी कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी हजेरी लावली. त्यांनी विद्यार्थ्यांना टी.व्ही., मोबाईल गेम यामध्ये जास्त वेळ खर्च न करता आई वडिलांची सेवा करण्याचे आवाहन केले. स्काऊट व गाईड चळवळ ही खऱ्या अर्थाने उद्याचे सुजाण नागरिक घडवत असल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांच्या या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध शाळांचे सुमारे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते.










