अकोले - अगस्तीसाखर कारखान्याचे अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री विद्यमान अध्यक्ष मधुकर पिचड यांची, तर जिल्हा सहकारी बँकेचे ...

अकोले - अगस्तीसाखर कारखान्याचे अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री विद्यमान अध्यक्ष मधुकर पिचड यांची, तर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांची उपाध्यक्षपदी गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी अरुण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अगस्ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी पिचड यांच्या नावाची सूचना संचालक प्रकाश मालुंजकर यांनी केली. संचालक मीनानाथ पांडे यांनी सूचनेला अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी गायकर यांच्या नावाची सूचना नवनिर्वाचित संचालक महेश नवले यांनी केली. या सूचनेस कैलास वाकचौरे यांनी अनुमोदन दिले. अगस्ती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व्ही. एस. बावीस्कर मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी पीठासिन अधिकारी अरुण ठाकूर यांना पदाधिकारी निवड कामी साहाय्य केले.
यावेळी संचालक तथा आमदार वैभव पिचड, संचालक प्रकाश मालुंजकर, कैलास वाकचौरे, रामनाथ वाकचौरे, मीनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, अशोक आरोटे, कचरू शेटे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, भास्कर बिन्नर, बाळासाहेब देशमुख, सुनील दातीर, सुरेखा सुधाकर देशमुख, मनीषा येवले उपस्थित होते. या निवडणुकीत पिचड गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे सर्व संचालक मताधिक्याने विजयी झाले आहेत. यामुळे आजची निवड एक औपचारिकता होती.
अध्यक्ष मधुकर पिचड उपाध्यक्ष सीताराम गायकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिचड म्हणाले, सहकारी साखर कारखान्याचा सन २०१५-१६ या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर २२ आक्टोबर २०१५ रोजी आपण केला. या हंगामासाठी अगस्ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गळितासाठी फक्त सव्वा दोन लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होती. यामुळे आपल्याला बाहेरील उसावर आवलंबून रहावे लागते. कार्यक्षेत्राबाहेरून राहुरी, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, नेवासे, श्रीरामपूर, नाशिकातील ऊस उत्पादक शेतकरी सातत्याने अगस्ती कारखान्यास ऊस पुरवठा करीत आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी करून ऊस कार्यक्षेत्राबाहेरून आणण्यासाठी प्रयत्न केले. ही स्थिती बदलली पाहिजे. उसाची लागवड तालुक्यात वाढवून स्वयंपूर्ण कसे होऊ शकतो, असा कार्यक्रम यापुढील काळात प्राधान्याने राबवण्यात येणार आहे.
उच्चस्तरीय कॅनॉलचे पाणी - पुढीलवर्षी निळवंडेच्या उच्चस्तरीय कॅनॉलचे पाणी निघणार असून परिणामी प्रवरा खोरेही बारमाही होणार आहे. पिंपळगावखांड धरण पूर्णत्वास जात आहे. बिताक्याचे पाणी आढळेला वळवून आढळा धरण आपण दरवर्षी भरणार आहोत. यातून कारखान्याला आवश्यक ऊस वाढणार आहे, असेही विद्यमान अध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले.










