दोन दिवसांपुर्वी राजस्थानमध्ये अखिल भारतीय प्रादेशिक संपादक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मनेका गांधीही सहभागी होत्या. सोनोग्...
दोन दिवसांपुर्वी राजस्थानमध्ये अखिल भारतीय प्रादेशिक संपादक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मनेका गांधीही सहभागी होत्या. सोनोग्राफी केंद्रावर बेकायदेशीरपणे करण्यात येणाऱ्या गर्भलिंग चाचणी संदर्भात त्यांना विचारणा केली गेली. तेव्हा त्या असे म्हणाल्या की, अशा चाचण्या करणाऱ्या दाम्पत्यांना आपण कधीपर्यंत पकडणार आहोत? लोकांना अटक करणे हा या समस्येवरील उपाय नाही. उलट मुलगा की मुलगी याचे एकदा लिंगनिदान झाले की, मुलीचा गर्भ असणाऱ्या मातेवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. त्यांची नोंद करता येईल आणि भ्रूणहत्या रोखता येईल. परंतु हे सांगतांनाच, हे माझे व्यक्तिगत मत आहे. यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात यावा असेही त्यांनी म्हटले. असे असले तरी, विरोधकांनी मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानाला किंबहुना प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांच्या विरोधाचा मुद्दा असा की, लिंग चाचणीवरील बंदी हटविली तर लोकांच्या मनात असणारा स्त्रीभ्रूणहत्या विरोधाचा धाक नाहिसा होईल. सोशल मिडीयावरही मनेका गांधी यांच्या विधानाला विरोध दर्शवणारी टीका होत असल्याचे दिसते. तसेच सध्याच्या कायद्यामुळे तरी किमान लिंग गुणोत्तराचा थोडाफार समतोल टिकला आहे. असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मनेका गांधी यांच्या विचारांनी सरकार प्रेरित होणार असेल व खरेच असे लक्ष ठेवणार असेल तर लोकांच्या कोणकोणत्या खाजगी बाबतीत सरकार लक्ष घालणार आहे? लोकांचे खाजगी जीवन त्यामुळे बाधीत होणार नाही का? असा सवाल लोकहीत संवर्धन करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे. शिवाय मुलीचा गर्भ ज्या महिलेच्या पोटात आहे त्या महिलेला जर शारिरीक- मानसिक छळाला कुटुंबीयांकड़ून सामोरे जावे लागले तर सरकार काय करणार? त्यासाठी थेट लोकांच्या घरात सरकार पोहोचणार का? असाही प्रश्न काही विचारवंत विचारतांना दिसत आहेत. शिवाय प्राप्त परिस्थितीत गर्भपाताला दिलेली कायद्याने परवानगी, तिचे काय करणार? हाही प्रश्न आहेच. शिवाय प्रत्येक गर्भवती महिलेच्या गर्भाची लिंग चाचणी करणे व तिच्यावर लक्ष ठेवणे, संरक्षण देणे हे सरकारला शत-प्रतिशत शक्य आहे का? शासकीय असो वा खाजगी रुग्णालये तेथील वैद्य, व्यवस्थापन, यांच्याकडून कसे व किती सहकार्य मिळेल असे सरकारला वाटू शकते? हाही प्रश्न आहेच. महत्वाचे म्हणजे लोकांनी या गोष्टीसाठी स्वतःच्या मनाची तयारी कशी व का करावी? इतक्या सगळ्या प्रश्नांच्या जंजाळानंतर पुन्हा मनेका गांधी यांच्या उपरोक्त वैयक्तिक मताकडे पाहिले तर काय हरकत आहे? या विचाराचाही परामर्श घेता येईल. आज देशभरातील संस्थांचा विचार केला तर हरियाणासारख्या काही राज्यात उपवर मुलांसाठी वधू आयात करावी लागते हे भीषण वास्तव आहे. मुलींचा जन्मदर स्थिरावत असला तरी परिणामकारकरित्या वाढतांना दिसत नाही. स्त्रीभ्रूणहत्या होतच नाही असे धा़डसाने तरी म्हणता येईल का? हा प्रश्न आहे अजूनही गर्भलिंग चाचणी केंद्रावरच्या धाडी बंद होत नाहीत. अशा अवस्थेत एकूणच अपत्य जन्म हा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेवून जन्मापर्यंत शासनाने गर्भवतींना दत्तक घेणे, म्हटले तर अगदीच अशक्य असे नाही परंतु त्यासाठी सर्व समाजातील लोकांना विश्वासात घ्यावे लागेल. विरोधी मत प्रदर्शन करणाऱ्यांचे मत विचारात घ्यावे लागेल. निर्णय म्हणून हा विचार थोपवता येणार नाही. अर्थात स्त्री जन्मदर वृध्दींगत करायचा असेल तर मनेका गांधींच्या मतावर किमान चर्चा करायला हरकत नसावी.
संपादक -
सॉलोमन गायकवाड,
अहमदनगर मो. 9225327301
अहमदनगर मो. 9225327301










