श्रीरामपूर : पोपट सुखदेव गायकवाड (वय ५२, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) या शेतकर्यास आत्महत्येस प्रवृत्त करुन त्याच्या मृत्यूस का...

श्रीरामपूर : पोपट सुखदेव गायकवाड (वय ५२, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) या शेतकर्यास आत्महत्येस प्रवृत्त करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन श्रीरामपूर शहर पोलिसांनी सुशीलाबाई कदम तिचा मुलगा संदीप व इतर दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.गुरुवारी (दि.२५) मयत पोपट गायकवाड याने दुपारी नगर-मनमाड रेल्वेमार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. गायकवाड यांच्याकडे एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्यात खासगी सावकारीच्या तगाद्यास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. मयत गायकवाड यांचा मुलगा सतीश (वय २१) याने गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुशीलाबाई कदम, तिचा मुलगा संदीप व अन्य दोघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. 'वडिलांनी बहिणीचे लग्न व आईच्या आजारपणासाठी सुशीलाबाई कदम हिच्याकडून १ लाख रूपये व्याजाने घेतले होते. तिला व्याजासह पैसे परत करूनदेखील सावकारकीचा परवाना नसताना चक्रवाढ व्याजाची मागणी होत होती. वडिलांकडून कोरे चेक व कोरे स्टँप घेऊन वसुलीसाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले.









