नगर - तंत्रज्ञान, आधुनिकताच्या या युगात मुस्लिम समाजही शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जात आहे. ही चांगली बाब आहे, पण चांगल्या जीवन व सुरळीत व...
नगर - तंत्रज्ञान, आधुनिकताच्या या युगात मुस्लिम समाजही शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जात आहे. ही चांगली बाब आहे, पण चांगल्या जीवन व सुरळीत वैवाहिक जीवनासही तंत्रज्ञान व आधुनिकतेबरोबर न जाता 1400 वर्षापूर्वी पैगंबरांनी दिलेल्या आदेशाचे व शरीयतचे पालन करणे गरजेचे आहे. आज मुस्लिम समाज शरीयत पासून दुरावल्यामुळे समाजात विवाहच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिसादन मुस्लिम समाजाचे गाढे अभ्यासक व धर्मगुरु मौलाना मुजतबा फारुकी यांनी केले.
दिशा मुस्लिम मॅरेज ब्युरो्च्या वतीने रहेमत सुलतान हॉल येथे अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच मुस्लिम समाजाच्या वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुस्लिम समाजाचे गाढे अभ्यासक व धर्मगुर मौलांना मुजतबा फारुकी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे खुद्दामे मिल्लत मॅरेज ब्युरोचे शेख फैसल होते.
मौलाना फारुकी म्हणाले की, आज गरज आहे शरीयत प्रमाणे फक्त मुलगा कमाऊ आहे का? खानदानी आहे का? हे बघावे व लग्न अगदी साध्या पद्धतीने करावे. लग्नात ढोल बाजे हलदी- मेहंदी, गाणे अशा अपप्रवृत्तींना आळा बसविला पाहिजे. प्रतिष्ठेच्या भानगडीत न पडता, साखरपुडा घरच्याघरी करावा. मुलगी व सून यामध्ये काही फरक करू नये. लग्न जमल्यावर मुलींच्या वडिलांवर जास्त भार टाकू नये. मुलगा-मुलगी पसंत असल्यावर शिक्षणाचा अडसर यात येऊ नये. तसेच समाजातील शिक्षीत मुलींच्या विवाहाचे प्रमाण वाढले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफिक मुन्शी यांनी केले. सुत्रसंचालन अॅड. फारुक बिलाल यांनी केले. यावेळी युनूस तांबटकर, डॉ. कमर सुरर, शरीफ खान, कादीर सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार राजूभाई शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशा मुस्लिम मॅरेज ब्युरोचे चाँदसाहब कॉन्ट्रॅक्टर, शफी जहागीरदार, इंजि. अनिस शेख, डॉ. रिजवान, अशफाक हुसेन, नादीर खान, निसार खान आदिंनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड,कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या पालक व वधू-वरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.









