नवी दिल्ली, दि. 11 (पीसीबी) - सियाचिनमध्ये झालेल्या हिमपातात अडकलेल्या जवानांपैकी आश्चर्यकारकरीत्या बचावलेले जवान हनुमंतप्पा कोप्पड यां...
नवी दिल्ली, दि. 11 (पीसीबी) - सियाचिनमध्ये झालेल्या हिमपातात अडकलेल्या जवानांपैकी आश्चर्यकारकरीत्या बचावलेले जवान हनुमंतप्पा कोप्पड यांची गेले नऊ दिवस सुरु असलेली मृत्यूशी झुंज आज (गुरुवार) अखेर संपली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
सियाचीनमध्ये हिमपातानंतर बर्फाखाली गाडल्याने दहा जवानांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ३० फूट खोल बर्फाखाली उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानात हनुमंतप्पा सहा दिवस होते. मदतकार्य करणाऱ्या पथकाला ते जिवंत आढळले. सियाचिन बेसकॅम्प येथून एअर ऍम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार होत असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आढळत नसल्याचे रुग्णालयाने बुधवारी म्हटले होते. डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. त्यांच्यावर उपचारांसाठी जगातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येत होता. गेल्या तीनदिवसांपासून ते लष्करी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. त्यांच्या कुटुंबियांनाही ते परततील अशी आशा होती. मात्र, अखेर आज नियतीने डाव साधला. हनुमंतप्पा शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले.










