नगर - सर्वोच्चन्यायालयासह देशातील सर्व न्यायालयांची उन्हाळी सुटी रद्द करावी, संविधानाचे कलम ३२ (३) खाली लोकल रिट्स दाखल करण्याचे अधिकार...
नगर - सर्वोच्चन्यायालयासह देशातील सर्व न्यायालयांची उन्हाळी सुटी रद्द करावी, संविधानाचे कलम ३२ (३) खाली लोकल रिट्स दाखल करण्याचे अधिकार जिल्हा न्यायालयांना द्यावेत होऊ घातलेल्या पुणे खंडपीठाशी नगर जिल्हा संलग्न करावा, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलन करण्यात आले.
महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. न्यायाग्रह आंदोलनात तिरंगे ध्वज हातात घेऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात अॅड. कारभारी गवळी,अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, अर्शद शेख, कैलास पठारे, ओम कदम, अॅड. लक्ष्मण पोकळे, अशोक शिंदे, वीरबहादूर प्रजापती, संतोष लोंढे, मोहंमद शेख, बबलू खोसला, अशोक ढाके, शाहीर कान्हू सुंबे, आशा शिंदे आदी सहभागी झाले होते. गवळी म्हणाले, इंग्रज देशातून जाऊन ६८ वर्षे झाली, परंतु त्यांच्या कार्यकाळापासून चालत आलेली न्यायालयांच्या सुटीची प्रथा आजही चालू आहे. प्रलंबित असलेले खटले निकाली लागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह सर्वच न्यायालयांची उन्हाळी सुटी कायमची तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भारतीय जनसंसदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.










