अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलल्याप्रकरणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व मुदस्सर शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुना...
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलल्याप्रकरणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व मुदस्सर शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी नाशिक विभागीय आयुक्तांसमोर सुरू आहे. सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना नाही, असा बोराटे, शेख यांचा अर्ज विभागीय आयुक्तांनी मंगळवारी फेटाळून लावला. पुढील सुनावणीवेळी त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध खंडपीठात धाव घेण्याची तयारी बोराटे यांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जून २0१५ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कॉँग्रेसचे मुद्दसर शेख हे पक्षादेश डावलून गैरहजर राहिले. पक्षादेश डावलला म्हणून दोघांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते समदखान, कॉँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना नाही, असा अर्ज मागील सुनावणीवेळी बोराटे, शेख यांनी सादर केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. विभागीय आयुक्तांना सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद कोतकर यांच्यावतीने अँड. कांबळे यांनी केला. तो ग्राह्य धरून विभागीय आयुक्तांनी बोराटे, शेख यांचे अर्ज फेटाळून लावले. पुढील सुनावणीवेळी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.










