खासगी कामासाठी केला वाळूचा वापर चौकशीसाठी तहसीलसमोर बैठा सत्याग्रह पाथर्डी - महसूलपोलिस विभागाने मागील एक-दोन वर्षांत सुमारे ३००...
खासगी कामासाठी केला वाळूचा वापर
चौकशीसाठी तहसीलसमोर बैठा सत्याग्रह
पाथर्डी - महसूलपोलिस विभागाने मागील एक-दोन वर्षांत सुमारे ३०० ब्रास अनधिकृत वाळू जप्त केली. संबंधितांकडून दंड वसूल होऊन वाळूसाठा तसाचा राहिला. या वाळूपैकी काही वाळू शासकीय कर्मचाऱ्यांनी खासगी कामासाठी वापरली. त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी मंगळवारी विविध कार्यकर्त्यांनी तहसीलसमाेर बैठा सत्याग्रह आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व सोनोशीचे सरपंच गोकूळ दौंड, वाळूंजचे सरपंच रणजित बेळगे, सुनील पाखरे, नबाब शेख, आजिनाथ घुगे, नागनाथ गर्जे, युसूफ शेख, राजेेंद्र दगडखैर,"आपalt39चे किसन आव्हाड, जालिंदर काटे आदींनी केले. पाखरे म्हणाले, महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू लांबवली. ज्या पद्धतीने वाळूविक्रीचे टेंडर काढायला पाहिजे. ती पद्धत अवलंबली नाही. वाळूची अफरातफर करताना सोईचे रेकाॅर्ड तयार करून घेतले. रेकॉर्डवर ५६ ब्रास वाळू दाखवली. प्रत्यक्षात विक्रीमध्ये ती वाळू ३० ब्रास दिसते. उरलेली २६ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. यात स्थानिक कर्मचारी असल्याचे पुराव्यानिशी म्हणणे आहे. शासनाची फसवणूक केली म्हणून आम्ही प्रसंगी न्यायालयात जाऊ. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. वाळूचा दर दहा हजार रुपये प्रति ब्रास असताना वाळूसाठा विक्रीचा दर २०४० रुपये कसा दाखवण्यात आला.
आंदोलकांची नायब तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी आंदोलकांची दूरध्वनीवरून निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्यांनी दहा दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.










