नगर शहरात व उपनगरात इलेक्ट्रीक विभागातील कर्मचारी पथदिवे (स्ट्रीट लाईट) चालू व बंद स्थितीतील दुरुस्तीच्या नावाखाली परस्पर काढून नेतात. पुन...

नगर शहरात व उपनगरात इलेक्ट्रीक विभागातील कर्मचारी पथदिवे (स्ट्रीट लाईट) चालू व बंद स्थितीतील दुरुस्तीच्या नावाखाली परस्पर काढून नेतात. पुन्हा अनेक दिवस लावलेच जात नाहीत. संबंधित विभागात चौकशी केली असता साहित्य नाही, बजेट नाही, सध्या कोणतेही इलेक्ट्रीक मटेरियल शिल्लक नाही. अशा स्वरुपाची कारणे सांगितली जातात. शहरामध्ये मध्य वस्तीतील कापड बाजार, नवी पेठ, चितळे रोड, घास गल्ली, तोफखाना, गांधी मैदान अशा विविध भागातील चालू स्थितीतील पथदिवे (एल.ई.डी. लाईट, हायमास्ट दिवे, साधे दिवे) या विभागातील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यापासून काढून नेले. परंतू ते आजपर्यंत पुन्हा बसवण्यात आले नाही. त्यामुळे असे पथदिवे दुरुस्तीसाठी कर्मचारी म.न.पा.च्या संबंधित विभागात जमा करतात की नाही? दुरुस्तीसाठी मनपाकडे वेगळा विभाग आहे का? कर्मचारी व संबंधित विभाग प्रमुख या पथदिव्यांची परस्पर कोठे विल्हेवाट लावतात का? संबंधित कर्मचाऱ्यांवर कुठल्या राजकीय पक्षाचा, नगर सेवकांचा दबाव आहे का? किंवा प्रत्येक भागातील इलेक्ट्रीक कर्मचारी यांनी स्थानिक नगर सेवकाच्या निदर्शनास आणून दिले काय? संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना कोणाचा आदेश होता का? याबाबत इलेक्ट्रिक विभाग प्रमुख खाते व कर्मचारी यांची चौकशी करुन वरील सर्व गोष्टींची लेखी उत्तरे निवेदन दिले पासून पंधरा दिवसांत न दिल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवक विक्रम राठोड यांनी मनपा आयुक्तांना पाठवून दिला आहे.









