नगर - मराठा सेवा संघाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील चित्रेही उद्या माणिक चौकातील आदर्श शाळेत पहायला मिळणार शिवजयंतीचे औचित्य साधून ...
नगर - मराठा सेवा संघाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील चित्रेही उद्या माणिक चौकातील आदर्श शाळेत पहायला मिळणार शिवजयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (19 फेब्रुवारी) शिवकालीन व निजामशाहीतील नाण्यांचे प्रदर्शन अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने भरवण्यात येणार आहे. माणिक चौकातील आदर्शशाळेत होणार्या या प्रदर्शनात जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील चित्रेही प्रदर्शित केली जाणार आहेत.
मखदुम सोसायटीच्या वतीने शिवकालीन दुर्गांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजित वाघ म्हणाले, जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त 10 जानेवारीला चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. पाच गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी किल्ला, चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक वास्तूस भेट, शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे शहाजीराजे, चौथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, महात्मा फुले पुतळा, किल्ला बनवणारे मित्र, रांझेकर पाटलांना शिवाजी महाराजांनी दिलेली शिक्षा, शिवरायांची बंगळुरूहून पुण्याकडे रवानगी, लष्करी वेषातील जिजाऊ, राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊंची केलेली सुवर्णतुला असे विविध विषय देण्यात आले होते. यातील उत्कृष्ट चित्रांची निवड परीक्षकांनी केली असून प्रदर्शनाच्या वेळी रसिकांनी दिलेले गुण विचारात घेऊन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त चित्रांची निवड केली जाईल.
नाशिक येथील महापेसमध्ये पारितोषिक मिळालेले सचिन डागा यांच्याकडील तिकिटे व दुर्मिळ नाणी, तसेच परदेशी यांनी काढलेली चार किल्ल्यांची छायाचित्रेही यावेळी पहायला मिळतील, असे मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबिदखान दुलेखान यांनी सांगितले. हे प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत विनामूल्य खुले असेल, असे इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष बहिरनाथ वाकळे यांनी सांगितले. माणिक चौकातील आदर्श शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्या प्रदर्शनात शिवराय, त्यांचे किल्ले, छायाचित्रे व नाण्यांचा समावेश असेल.









