अहमदनगर - अव्वल कारकूनांची 24 पदे रिक्त झालेली असून त्या पदांवर तलाठ्यांची नियुक्ती होते मात्र यावेळी वसुली पुर्ण केल्याशिवाय पदोन्न...
अहमदनगर - अव्वल कारकूनांची 24 पदे रिक्त झालेली असून त्या पदांवर तलाठ्यांची नियुक्ती होते मात्र यावेळी वसुली पुर्ण केल्याशिवाय पदोन्नती मिळणार आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील 24 तलाठ्यांची पदोन्नती ही लांबणीवर टाकण्यात आली आहे.
मार्च अखेर असल्यामुळे गावपातळीवरील तलाठ्यांचे वसुलीचे काम जोरात सुरु आहे. महसूल विभागाने सध्या 82 टक्के वसुली केली असून 31 मार्चपर्यंत 100 टक्के वसुली करण्याची हमी दिली आहे. आत्तापर्यंत तलाठ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती केली जात होती मात्र यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तलाठ्याच्या पदोन्नतीला वसुलीचे निकष लावल्यामुळे तलाठ्यांची पदोन्नती थांबविलेली आहे. पदोन्नती देण्याआधी त्यांनी सोपविलेले विविध कामे जसे सातबाऱ्याचे वाटप, गावातील रोहयोसह जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा वेळेत दिला की नाही? तसेच वसुली संदर्भातील व त्यांचे गोपनीय अहवाल तपासले जाणार आहेत. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.










