श्रीरामपूर : लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना पैशांची सोय न झाल्याने गोकुळ बाळकृष्ण आदिक (वय २४) या नियोजित वर असलेल्या तरूण शेत...
श्रीरामपूर : लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना पैशांची सोय न झाल्याने गोकुळ बाळकृष्ण आदिक (वय २४) या नियोजित वर असलेल्या तरूण शेतकर्याने विष घेऊन आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली.
खानापूर येथील गोकुळ याचा ३ मार्चला हारदेवाडी (ता. वैजापूर) येथे विवाह सोहळा होता. त्यासाठी लग्न पत्रिका वाटपाचे काम सुरू होते. त्याच्या वडिलांच्या नावावर चार एकर शेती आहे. पण दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न मिळाले. चार बहिणींच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वडिलांकडून झाली नाही. त्यात लग्न तोंडावर आले असतानाही पैशांची व्यवस्था न झाल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून गोकुळ याने आत्महत्या केली.
दोन दिवसांपूर्वी तो मारूतीचे दर्शन घेऊन पत्रिका वाटायला जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली असता तो शेतात बेशुद्धावस्थेत सापडला. त्याच्या जवळ विषारी औषधाची बाटली सापडली. त्याला तातडीने श्रीरामपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला नगरच्या रूग्णालयात हलविण्यात आले. रविवारी त्याचे उपचारा दरम्यान निधन झाले.










