नगरमधील महिला बचतगटांना व्यवसायासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा - आमदार संग्राम जगताप. नगर - महिलांनी एकत्र येऊन आ...
नगरमधील महिला बचतगटांना व्यवसायासाठी जिल्हा
बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा - आमदार संग्राम जगताप.
नगर - महिलांनी एकत्र येऊन आदिमाया प्रतिष्ठानची स्थापना केली असून, हा त्यांचा उपक्रम आहे. प्रतिष्ठानने महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम व्हावे. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी. महिलांमध्ये अनेक कलागुणांचा खजिना असतो, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बचतगटाची स्थापना करून प्रत्येकीला स्वतःच्या पायावर उभे करण्यात प्रतिष्ठानने महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी. नगरमधील महिला बचतगटांना व्यवसायासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.कॉटेज कॉर्नर, जयमंगल नगरी येथे आदिमाया प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभागृहनेते कुमारसिंह वाकळे, नगरसेवक संपत बारस्कर, सुरेश चव्हाण, कैलास आडसुरे, मुजाहिद कुरेशी, रेखा भोईटे, रंजना उकिर्डे, मंजू साठे, अपर्णा पालवे, बेबी नाणेकर, सुमन सोलकर, रत्नमाला नवगिरे, आशा
सैंदर आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, महिलांना समाजात काम करण्यासाठी शरद पवार यांनी 50% आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा. प्रतिष्ठानने महिलांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे ते म्हणाले.रेखा भोईटे म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण हा उद्देश नजरेसमोर ठेवून आदिमाया प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानद्वारे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. महिलांच्या हस्तकलेला वाव मिळवून देऊ, असे सांगितले.










