दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने अनेक आर्थिक प्रश्न उद्भवले आहेत. मुलीच्या व मुलाच्या लग्नासाठी व्याजाने पैसे घेतले आहेत. बिल लव...
दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाने अनेक आर्थिक प्रश्न उद्भवले आहेत. मुलीच्या व मुलाच्या लग्नासाठी व्याजाने पैसे घेतले आहेत. बिल लवकर मिळाले नाही तर कुटुंबाची उपासमार निश्चित आहे.
- कंपनीचा खाजगी वाहनधारकवाहनधारकांच्या थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करीत आहोत. त्यांच्या आर्थिक अडचणी आपण समजावून घेतल्या आहेत. त्यामुळे आठवड्याभरात त्यांचे बिल मार्गी लागलेले असेल.
वीज वितरण कंपनीच्या अहमदनगर कार्यालयातील कार्यरत असलेल्या खाजगी वाहनाधारकांची बिले थकल्याने वाहनधारक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चालकांची परिस्थिती समजून घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे वेळ नाही. त्यामुळे वाहनधारक व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी वाढतच चालली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांनी व त्यांच्या कुटुबियांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
वीज वितरण कंपनीच्या अहमदनगर शहर व ग्रामीण विभागात काही खाजगी चारचाकी वाहने भाडे तत्त्वावर कार्यरत आहेत. यातील काही वाहने उपविभागात देखील कार्यरत आहेत. नेवासे, पाथर्डी, शेवगाव, नगर, पारनेर व घोडगाव या उपविभागातील वाहनांची विद्युत कंपनीने सुमारे नऊ लाख रुपयांची बिले थकवली आहेत. कंपनीने ही बिले वर्षभरापासून थकवली आहेत. त्यामुळे हे वाहनधारक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या वाहनधारकांचा व वीज वितरण कंपनीचा करार झाला आहे. त्यानुसार वाहनधारकांना कंपनीकडून दर महिन्याला सुमारे २४ हजार रुपये मिळतात. यातूनच वाहनधारकांना डिजेलचा खर्च करावा लागतो. त्यामुळे महिन्याला डिजेल खर्च जाऊन वाहनधारकांच्या हातात सुमारे १२ हजार रुपये राहतात. पण वर्षभरापासून बिलच थकले असल्याने वाहनधारकांना पदरमोड करून वाहनात डिजेल टाकावे लागत आहेत. थकलेले बिल मिळत नाही आणि कंपनीशी केलेल्या करारानुसार काम तर करावे लागतेच. त्यामुळे पदरमोड करून वाहनात डिजेल टाकून कंपनीच्या सेवेत वाहनधारकांना कार्यरत राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वाहनधारकांची दुहेरी कोंडी झाली आहे.










