राहुरी - औरंगाबाद खंडपिठाने झोपडपट्टी धारकांचे 7/12 उतारे कायम करून त्यांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्याचे आदेश होऊन 8 महीने उलटले...
राहुरी - औरंगाबाद खंडपिठाने झोपडपट्टी धारकांचे 7/12 उतारे कायम करून त्यांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्याचे आदेश होऊन 8 महीने उलटले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने झोपडपट्टी निवासी अतिक्रमणे कायम करणेसाठी व औरंगाबाद खंडपिठाच्या दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन होण्यासाठी, तालूक्यातील झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना तात्काळ मालकी हक्काचे 7/12 उतारे मिळण्यासाठी दिनांक 30 मार्च रोजी तहसील कार्यालयावर राष्ट्रीय दलित न्यायहक्काचे जिल्हाध्यक्ष प्रविण लोखंडे व महीला जिल्हाध्यक्षा यमूनाताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
राहुरी तालूक्यात एकूण 7 मंडळाधिकारी आहेत, या मंडळामधील शासनाच्या जमिनीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टीचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमणे झालेली आहेत. बरीच अतिक्रमणे ही 40 वर्षे पूर्वी पासूनची आहेत परंतू शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोंदी बाबत उदासीनता दाखविल्याचे दिसून येत आहे. 4 एप्रिल 2002 चे महसूल व वन विभागाचे शासन निर्णयाला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहे. परंतू त्याची अंमलबजावणी तालूक्यात झालेली नाही. तहसील कार्यालयामध्ये एकही झोपडपट्टी नियमाकूल झालेचे दिसत नाही. अर्थात शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी संबंधीत अधिकारी करत नाही हे दिसत आहे. कर्मचारी व संबंधित अधिकारी हे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.
श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी औरंगाबाद खंडपिठात 39/2014 जनहीत याचिका दाखल केली होती. त्यानूसार 23 जून 2014 रोजी औरंगाबाद खंडपिठाने झोपडपट्टी धारकांचे 7/12 उतारे कायम करून त्यांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्याचे आदेश दिलेले आहेत. न्यायालयाचा आदेश होऊन 8 महीनेचा कालावधी लोटला तरी त्या आदेशाचे पालन अधिकाऱ्यांनी केलेले नाही. झोपडपट्टी धारकांना त्वरीत मालकी हक्काचे 7/12 उतारे मिळावे या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्काचे वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रविण लोखंडे, महीला जिल्हाध्यक्षा यमूनाताई भालेराव, उपाध्यक्षा अंजूम शेख, महीला तालूकाध्यक्षा सौ. रजनी कांबळे, उपाध्यक्षा अनिता बोरूडे, बाबासाहेब साळवे, किशोर पवार, प्रभाकर कांबळे, अप्पासाहेब मकासरे, प्रकाश साळवे, आदिंच्या सह्या आहेत. तर मोर्चा दरम्यान प्रविण लोखंडे, मदिना शेख, बबन साळवे, यमूनाताई भालेराव, सुरेश आरणे, राजेंद्र निंबाळकर आदिंची भाषणे झाली.
न्यायालयाच्या आदेशाला पायंदळी तूडवत पैसे खाऊन बसलेल्या भ्रष्ट अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करून झोपडपट्टी धारकांना त्वरीत मालकी हक्काचे 7/12 उतारे मिळावेत, असा एकच सूर यावेळी झोपडपट्टी धारकांनी लावला होता. यावेळी तहसीलदार अनिल दौंडे व पोलिस निरीक्षक संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. झोपडपट्टी धारकांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी तहसीलदार दौंडे यांनी दिली.










