हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार (Coronary Heart Disease) हा जगभरातील होणाऱ्या मृत्युचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा भयंकर आजारावर मात ...
हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार (Coronary Heart Disease) हा जगभरातील होणाऱ्या मृत्युचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा भयंकर आजारावर मात करण्यासाठी संशोधन करुन सर्वसामान्यांच्या उपयोगाचे तंत्रज्ञान शोधून ते वापरात आणणे हे डॉ.निखिल जोशी व त्यांच्या टीमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. एडीनबर्ग विद्यापीठातील रॉयल इर्न्फमरी या हॉस्पिटलमध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान हे अत्यंत नाविन्यपुर्ण उपचार पध्दतीवर संशोधन करुन त्यात महत्वपूर्ण बदल घडविणारे म्हणूनच जीवनाचा अर्थ बदलविणारे आहे.
या महत्वपूर्ण योगदानासाठी ब्रिटनच्या राणीकडून डॉ.निखिल जोशी, त्यांचे मार्गदर्शक व सहकारी यांचे क्विन्स अॅनेव्हर्सरी प्राईज साठी निवड करण्यात आली व त्यांना हे पारितोषिक लंडनच्या राजमहालात दि. 25 फेब्रुवारी 2016 रोजी प्रदान करण्यात आली.
हे अत्यंत प्रतिष्ठेचे व सन्मानाचे पारितोषिक दर दोन वर्षांनी जाहिर केले जाते. ब्रिटनमध्ये कार्यरत असणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक व मार्गदर्शक संस्थांसाठी ही पारितोषिके असून ब्रिटनमधील विद्यापीठे अशा पारितोषिकांसाठी पात्र होऊ शकतात. डॉ.निखिल जोशी हे एडीनबर्ग युनिर्व्हसिटीच्या बीएचएफ सेंटर फॉर कार्डीव्हस्कुलर सायन्स येथे कार्डीओलॉजीस्ट म्हणून कार्यरत व संशोधक आहेत. या टीमचे मार्गदर्शक व डॉ.निखिल यांचे सर्व सहकारी यांना ब्रिटनच्या राणीच्या वतीने राजपुत्र चार्ल्स - हिज हायनेज प्रिन्स ऑफ वेल्स - व त्यांच्या पत्नी कॅमिला - हर हायनेस टचेस ऑफ कॉर्नवेल - यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. जगभरातील विविध वृत्तपत्रांमधून व संशोधन विषयक नियकालिकांमधून हा वृत्तांत प्रसिध्द झाला.
डॉ.निखिल जोशी हे अहमदनगर येथील सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.विलास जोशी व सौ.पल्लवी जोशी यांचे चिरंजीव असून गेली 11 वर्षे ते ब्रिटनमध्ये हृदयरोगविषयीच्या संशोधनात कार्यरत आहेत.










