जवळेतील पिके धोक्यात जवळे : पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील जवळा, गुणोरे, गाडीलगाव, निघोज भागातील पिके, फळबागा पाण्याअ...
जवळेतील पिके धोक्यात
जवळे : पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील जवळा, गुणोरे, गाडीलगाव, निघोज भागातील पिके, फळबागा पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत.
यंदा जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठला. अनेक शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्थांकडून कर्ज काढून बियाणे, खते, औषधांची खरेदी केली. परंतु पीक बाजारात जाण्यापूर्वीच पाणी टंचाई निर्माण झाल्याने पिकांवर झालेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असे गुणोरे येथील डाळींब उत्पादक मनसुख बढे यांनी सांगितले. कुकडी पट्टय़ातील गावे म्हणून पन्नास पैशापेक्षा जास्त आणेवारी देण्यात आली. परंतु पाण्याअभावी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
संत तुकाराम बीज महोत्सव : सचिन महाराजांचे निरुपण
पारनेर शहरात प्रथमच युवकांनी एकत्र येऊन जगदगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठाणची स्थापना करुन सोमवारपासून संत तुकाराम बीज महोत्सवास प्रारंभ झाला. सचिन महाराज शेटे संत तुकाराम यांच्या जीवनगाथेवरील निरूपण करीत आहेत.
तुकाराम महाराजांनी अध्यात्माचा आनंद घेताना भंडारा डोंगरावर तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करून घेतले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग वाणीतून समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढींवर प्रहार केला आहे. शांतीलाल चोपडा,योगेश औटी,भिमाजी औटी, प्रकाशशेठ रोकडे यांनी महाप्रसाद दिल्याने त्यांचा शेटे महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मृदुंगमणी स्वप्नील महाराज पुजारी, रामदास थोरात, संतोष गाढवे, अँड.सचिन पठारे, गंगाराम खोडदे, दत्ता शेटे, मनोहर सिनारे, बाबा महाराज दळवी आदी उपस्थित होते.
सुप्यात कचऱ्यासह टाकाऊ वस्तुंची होळी
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी कचऱ्यासह टाकाऊ वस्तुंची होळी केली.
होळीमध्ये गोवऱ्या, झाडांच्या फांद्या, खोडे टाकून गावोगाव मोठय़ा होळ्या पेटवून प्रदूषणासह पर्यावरणाची हानी होते, हे निदर्शनास आल्यावर सुपा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय परिसरातील कचरा व टाकाऊ वस्तुची होळी करण्याची संकल्पना सूचली. परिसर स्वच्छ करून जमवलेला कचरा विद्यार्थ्यांनी एकत्र करून त्याची होळी केली. यावेळी कृत्रिम रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर, आपल्यातील दुगरुणांची होळी करण्याचे ठरवून पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचतीचा संकल्प केला. त्यासाठी गावात विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूत म्हणून काम करण्याचे आवाहन चांगदेव आंधळे यांनी केले. यावेळी दिलीप भांगरे, शिवाजी येणारे, सुवर्णा वाडेकर, शिवाजी पानमंद, उत्तम ठोकळ, गाडीलकर, गंगाधर लोंढे, वाळके यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.










