नगर - 3 कोटी खर्च करुन 8 वर्षापुर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा अद्यापही वापर न झाल्यामुळे सारसनगर भागातील नागरिकांना टँकरचेच पा...
नगर - 3 कोटी खर्च करुन 8 वर्षापुर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा अद्यापही वापर न झाल्यामुळे सारसनगर भागातील नागरिकांना टँकरचेच पाणी वापरावे लागत आहे. मग पाण्याची टाकी असूनही सारसनगर टॅंकरमुक्त कधी होणार? असा सवाल माजी नगरसेवक सुनिल त्रिपाठी यांनी महानगरपालिकेला केला आहे.
सन 2004 ते 2015 या 11 वर्षामध्ये सारसनगरमधील नागरिकांना पाणी पुरवठा कऱण्यासाठी पाण्याच्या टँकरवर जवळपास 3 कोटी रु. खर्च केलेले आहेत. सारसनगरच्या पाणी प्रश्नासाठी सन 2004 मध्ये सुनिल त्रिपाठी, मनेष साठे, शंकररावजी घुले, सौ.मनिषा भागानगरे या तत्कालिन नगरसेवकांनी यादी देऊन तत्कालिन महापौर भगवानरावजी फुलसौंदर यांच्या सहकार्य़ाने समर्थनगर येथे 10 लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करुन घेतली. त्या टाकीद्वारे सारसनगर, भवानीनगर, नानाजीनगर, डॉक्टर कॉलनी, पूनन मोतीनगर, परीक्षा बोर्ड परिसर, महेरे कॉलनी, कानडे मळा, कोठी परिसर, सथ्था कॉलनी, ढोरवस्ती या भागांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार होता. परंतु या पाण्याच्या टाकीला 8 वर्ष होऊनही पाण्याचा एक थेंब टाकीमध्ये पडलेला नाही. प्रशासनाने याविषयी गांभीर्य़ाने लक्ष देण्याची गरज आहे. मनपा प्रशासनाने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास या प्रश्नासाठी न्यायालयीन कार्य़वाही महापालिकेच्या विरुध्द करावी लागेल, असे माजी नगरसेवक सुनिल त्रिपाठी यांनी सांगितले.










