शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा १५ टक्क्यांपर्यंत खाली आला असून त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाल...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा १५ टक्क्यांपर्यंत खाली आला असून त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या धरणात केवळ ३२३१ दशलक्ष घनफूट (१५.०२ टक्के) पाणी शिल्लक आहे. मागील सव्वा महिन्यात केवळ पिण्याच्या पाण्यासाठी ५५० दशलक्ष घनफूट पाणी धरणाबाहेर पडले.
गेल्या वर्षी मुळा धरणात ९८ टक्के पाणी होते पण सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाची तीव्रता आता चांगलीच जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षी इतकाच सरासरी पाऊस झाला असला, तरी धरणात कमी पाणी साठले. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात यंदा १५६०० दशलक्ष घनफूटचा (६० टक्के) कमाल पाणीसाठा होऊ शकला. यातील ४५०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता केवळ ५२ टक्के कमाल उपयुक्त साठा होता. खरीप हंगामाच्या आवर्तनाला यातून कात्री लागली. रब्बी हंगामासाठीही ३८०० दशलक्ष घनफूट पाण्याचे अर्धवट आवर्तन मिळू शकले. त्यातच समन्यायी पाणीवाटप धोरणामुळे धरणातून १७४० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला गेले. त्यामुळे मुळा धरणातील उपयुक्त पाण्याने गेल्या अनेक वर्षांतील नीचांक गाठला.
सध्या धरणात हजार ७४१ दशलक्ष घनफूट पाणी आहे. ४५०० मृतसाठा वगळता अवघे ३२३१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करता येईल. पावसाळा सुरू होऊन धरणात पाणी येण्यास जुलै महिना उजाडतो. गेल्या दोन वर्षांतील अनुभव पाहता नवीन पाणी येण्यासाठी जुलै अखेर प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पिण्याचे, उद्योगाचे, आरक्षित पाणी, बाष्पीभवन व्यय गृहित धरता ३१५९ दशलक्ष घनफूट पाणी खर्च जाणार आहे. प्रशासन पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार जुलैअखेरीस धरणात अवघे ७२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या पंपाचे फुटव्हॉल्व्ह उपयुक्त पाण्याच्या पातळीपर्यंतच आहेत. त्यामुळे गरज भासली, तरी मृतसाठ्यातून शहराची तहान भागवणे अशक्य आहे. पंपावरील पाणीपातळी कमी होईल, तशी पंपाची पाणी खेचण्याची क्षमता कमी होणार आहे. परिणामी जून महिन्यात पाणी उपशावर परिणाम होऊन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. भविष्यातील अडचण लक्षात घेऊन आतापासूनच उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन काळजीपूर्वक वापर आवश्यक आहे.










