नगर- सर्वसामान्यांना, गरीब रुग्णांसाठी कॅशलेस, सरकारी व खासगी, अशा अनेक योजना असल्या तरी प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर...
नगर- सर्वसामान्यांना, गरीब रुग्णांसाठी कॅशलेस, सरकारी व खासगी, अशा अनेक योजना असल्या तरी प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक अडचणी येतात. त्यामुळे गरीब रुग्णांना मदतीसाठी अॅड.धनंजय जाधव यांनी ‘हेल्प मी इंडिया’ या वेबसाईटद्वारे रुग्णांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. सर्वांना नेहमीच मदत करणारे अॅड.जाधव यांनी सुरु केलेल्या या उपक्रमास रुग्णांबरोबरच मित्र परिवाराचाही हातभार लागत आहे. सोशल मिडियाचा असा चांगला उपयोग करुन तरुणांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा यांनी केले.
या वेबसाईट विषयी माहिती देताना अॅड.धनंजय जाधव म्हणाले, ज्या गरीब रुग्णाला निधीची गरज आहे, त्याने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील रिपोर्ट, निधीची गरज, नाव, रुग्णालयातील बँक खाते क्रमांक आदि सर्व माहिती वेबसाईटवरील ई-मेलद्वारे टाकावी किंवा प्रत्यक्ष कार्यालयात द्यावी, संबंधित रुग्णाची सर्व खात्री करुन ही सर्व माहिती छायाचित्रासह वेबसाईटवर टाकली जाते. ती पाहून ज्यांना निधी द्यावयाचा आहे, ते थेट संबंधित रुग्णाच्या हॉस्पिटलमधील खात्यावर किंवा हॉस्पिटलच्या बँक खात्यावर जमा करतात, त्यामुळे हा निधी थेट रुग्णाला मिळतो.
माजी नगरसेवक अॅड.धनंजय जाधव यांनी रुग्ण व दाते यांच्यासाठी तयार केलेल्या ‘हेल्प मी इंडिया’ या वेबसाईटची माहिती देण्यात आली. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सहा कामगार आयुक्त युवराज पडियाल, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, विलास लोढा, बाबूशेठ लोढा, सीए अशोक पितळे, मितेश शाह, वसंत चोपडा, ऍड.सप्तर्षी आदि मान्यवर उपस्थित होते.









