राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या राज्यव्यापी अधिवेशनाकडे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्य...
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या राज्यव्यापी अधिवेशनाकडे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निमंत्रित करूनही पाठ फिरवल्याने आता आपल्या न्याय मागण्यांसाठी लाखो शिक्षक आझाद मैदानावर मोर्चा नेवून आपली ताकद दाखवून देतील, असा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजी पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने शिर्डीत दोन दिवशीय राज्यस्तरीय खुले अधिवेशन या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ संजय मालपाणी यांच्यासह संघटनेचे विष्णू खांदवे, बाळासाहेब काळे, केशव जाधव, राजाराम वरूटे, दी. रा. भालतडक, मधुकर काठोळे, वसंत हारूगडे, माधव पाटील, तुकाराम कदम, लायक पटेल, संजय त्रिभुवन, राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे आदींसह जवळपास तीस हजार शिक्षकांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना या अधिवेशनाला हजेरी लावून शिक्षणाच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतु ते आले नाहीत. राज्यात प्राथमिक शाळा बंद करून खासगी शाळा सुरू करण्याचा धडाका सरकारने लावल्याने गरिबांच्या मुलांनी कुठे शिक्षण घ्यायचे, असा सवाल करत खासगी शिक्षण संस्थांची दुकानदारी मोडीत काढण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राच्या धर्तीवर शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली.










