नगर तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर गारपिटीचा जबर तडाखा नगर - नगर तालुका दुष्काळाशी झुंजत आहे. शेतकरी टँकरने पाणी देऊन फळबागा...
नगर तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर गारपिटीचा जबर तडाखा
नगर - नगर तालुका दुष्काळाशी झुंजत आहे. शेतकरी टँकरने पाणी देऊन फळबागा जगवत आहेत. शनिवार, रविवारी आणि सोमवार या तीन दिवसांत तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. या गारपिटीने फळबागधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खडकी खंडाळा, बाबुर्डी बेंद, सारोळा कासार, वाळकी, वडगाव तांदळी, देऊळगाव आदी भागात गारपिटीचा तडाखा फळबागांना बसला. हिरवी फळे गारांच्या माऱ्याने पडून गेली.
तालुक्यातील खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, सारोळा कासार, वाळकी, देऊळगाव, वडगाव तांदळी या भागात सुमारे एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भागावर संत्रा लागवड आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकरी फळबागा जगवण्यासाठी नगर शहरातून टँकर नेऊन फळबागांना जगवत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्याऱ्या शेतकऱ्यांना शनिवार, रविवार, सोमवारी अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या वर्षी तडाखा दिला. मागील वर्षी मार्चमध्येही अशीच गारपीट या भागात झाली होती. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले होते. आताही या भागात जाेरदार वाऱ्यासह गारपीट झाली.
दरम्यान, तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे तातडीने पंचनामे करावे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाळासाहेब पोटघ्न, बबन कासार, दादा बोठे यांनी तहसीलदार सुधीर पाटील यांनी केली आहे.










