खादी निर्मिती उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे खादीची मागणी वाढल्याने या उद्योगातील रोजगार निर्मिती वाढत आहे. दो...
खादी निर्मिती उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे खादीची मागणी वाढल्याने या उद्योगातील रोजगार निर्मिती वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी या उद्योगक्षेत्रात जवळपास १0 लाख कामगार काम करत होते आता त्यात वाढ होऊन ही संख्या ११.३ लाखावर गेली आहे.
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोशाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघु विणकरांच्या फायद्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा एक भाग म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी खादीचे कपडे परिधान करण्याचे आवाहन कर्मचार्यांना करावे, अशी विनंती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आयोगाच्या या विनंतीवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
देशभरातील सर्व सरकारी कर्मचार्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे परिधान करावेत,' असे आवाहन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी केले आहे. तथापि खादीचा पोशाख परिधान करणे ऐच्छिक असेल. खादीची विक्री वाढविण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. प्रत्येकाने खादीचा एक पोशाख जरी खरेदी केला तरी विक्री किती वाढेल, असा त्याचा उद्देश आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्याचे प्रतिपादन अनेकदा गेले आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली आहे.










