अहमदनगर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी पहाटे गजाआड केली. रामा सीतारा...
अहमदनगर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी पहाटे गजाआड केली. रामा सीताराम पवार (वय २३, रा. ढवणवस्ती, नगर), शुभम मच्छिंद्र देवकर (वय २0, रा. खांडगाव, ता. संगमनेर) व अशोक राजू वाघ (वय १९, रा. देवगाव, ता. नेवासे) या तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात दोन मोटारी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व कर्मचार्यांनी तत्काळ कारवाईला सुरूवात केली. पोलीस आल्याचे पाहून मोटारीतील व्यक्तींच्या हालचाली सुरू झाल्या. काहींनी पळ काढला. पोलिसांनी लगेचच मोटारीला घेरावा घातला. त्यात तिघांना ताब्यात घेण्यात आले. मोटारीतून बाहेर पडलेले चौघे घाटातील जंगलात पळत सुटले. काही अंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेत ते चौघे पसार झाले.
रामा, शुभम व अशोक या तिघांना दोन मोटारीसह पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तपासणी करण्यात आली. त्यात गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुस, तलवार व सत्तुर अशी हत्यारे पोलिसांनी आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करत या तिघांना अटक केली. लूट किंवा दरोड्याच्या तयारीने ही हत्यारे जवळ बाळगली असल्याची माहिती या तिघांनी प्राथमिक चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालायाने त्यांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.










