सध्या ई- औषध योजना रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र इतर सेवा ऑनलाईन नाहीत. त्या ऑनलाईन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.रुग्णांना दिला जाणार...
सध्या ई- औषध योजना रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र इतर सेवा ऑनलाईन नाहीत. त्या ऑनलाईन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.रुग्णांना दिला जाणारा केसपेपर आणि गोळ्यांची माहिती ऑनलाईन झाल्यास त्याचा फायदा होईल.
जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर : खाजगी रुग्णालये हायटेक झाली आहेत. सरकारी रुग्णालयांचा कारभार अद्यापही चिठ्ठीवरच सुरू आहे. मात्र पुढील महिन्यांत जिल्हा रुग्णालयांसह आरोग्य उपकेंद्रांचा कारभार ऑनलाईन होणार आहे. रुग्णांना दिला जाणारा केस पेपर आणि औषधांच्या पावत्या रुग्णालयातून हद्दपार होणार आहेत.
राष्ट्रीय प्रसारण सूचना विभागाकडून जिल्ह्यांतील बहुतांश सेवा ऑनलाईन आहेत. ऑनलॉईन सेवांमुळे कार्यालयांतील कारभाराला गती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांचा कारभार ऑनलाईन झाला आहे. इतर कार्यालयांचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यात २३ ग्रामीण रुग्णालये आणि दोन उप जिल्हा रुग्णालये आहेत. ही रुग्णालये ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. ही संस्था ऑनलाईन सेवांबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल. प्रशिक्षणानंतर पुढील महिन्यात शासकीय रुग्णालयांचा कारभार ऑनलाईन होणार आहे. रुग्णांची नोंदणी, औषधे आणि गोळ्यांची नोंदणी ऑनलाईन होईल. याशिवाय विविध तपासण्यांच्या नोंदीदेखील ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार्या प्रत्येक रुग्णांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्यामुळे उपचारासाठीच्या फाईलींची कटकट दूर होणार आहे. तसेच कुठल्या रुग्णालयात दिवसभरात किती रुग्ण उपचारासाठी आले, त्यांच्यावर काय उपचार झाले, त्यांना दिले जाणारे औषध, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.आजारांचीही माहिती मिळणार असल्याने त्यावर जनजागृती करणे शक्य होणार आहे.










