नगर - आज अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेची माध्यमिक शिक्षक भवनात तातडीची सहविचार सभा राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या नेतृ...
नगर - आज अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेची माध्यमिक शिक्षक भवनात तातडीची सहविचार सभा राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. या सभेला संबोधित करताना सुनिल गाडगे म्हणले की, जुन 2016 पासून २० पटाच्या विद्यार्थी संख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करुन हे विद्यार्थी जवळपासच्या शाळांमध्ये समाविष्ट करुन शिक्षक अतिरिक्त करावयाचे आहे. या सगळ्यांना आपल्याला विरोध करावाच लागेल. त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याची तयारी शिक्षक आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य संघटनेच्या आदेशान्वये एप्रिलमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्य़ालयासमोर करावयाचे आहे.
शिक्षणहक्क कायद्यानुसार प्राथमिक माध्यमिक शाळांतील शाळा बाह्य विदयार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे मुलांचे सर्वेक्षण करायचे. तर 20 पटाच्या आतील शाळा बंद करुन पुन्हा शाळकरी मुलांना शाळाबाह्य करण्याचा अट्टहास सरकार करु पाहत आहे. शिक्षणावर साडेसहा टक्के खर्च होणे अपेक्षित असतांना 4 टक्के खर्च केला जातो व अतिखर्चाच्या नावाखाली शिक्षक संख्या घटविण्याच्या प्रयत्न करुन समाजात बेरोजगारी वाढविण्याचे काम राज्य सरकार करु पाहत आहे. शिक्षण क्षेत्रात प्रत्येक महिन्याला वेगवेगळे परिपत्रक काढून राज्य सरकार शिक्षकांच्यामागे असंतोष निर्णाण करत आहे. याला विरोध म्हणून एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.










