पुणे : राज्य शासनाने प्रवासी आणि मालवाहतूक करणार्या वाहनांच्या परवाना, तसेच नूतनीकरण शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. ही वाढ रद्द करण...
पुणे : राज्य शासनाने प्रवासी आणि मालवाहतूक करणार्या वाहनांच्या परवाना, तसेच नूतनीकरण शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. ही वाढ रद्द करण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, येत्या १५ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारण्याची घोषणा मालवाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींकडून सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील नऊ लाख ट्रक, अडीच लाख खासगी बसेस, दोन लाख प्रवासी वाहने, दोन लाख टॅक्सीचे शुल्क वाढणार आहे. त्यामुळे येत्या ८ मार्च रोजी सकाळी १0.३0 वाजता आरटीओ कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापयर्ंत एकदिवसीय राजव्यापी मोर्चा काढून संप पुकारण्यात येणार आहे.
परवाना शुल्कात केलेल्या वाढीसंदर्भात आमदार, परिवहनमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले होते; पण त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने १५ मार्चपयर्ंत या संपाची दखल घेतली नाही तर रिक्षा, टॅक्सी, बस आदी सर्व वाहने या संपात सहभागी होतील आणि बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक, प्रतिनिधी महासंघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, की राज्य सरकारने या परवाना शुल्कात केलेल्या वाढीने प्रवासी, मालवाहतुकीचा दर वाढेल. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसेल. यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.यामध्ये आंतरराज्यीय माल वाहतूक, तसेच खासगी बस, शैक्षणिक व कराराने मिळणार्या बस व कंत्राटी सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो, बस, ट्रॅक्टर, वाहतूक महासंघ, महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक, प्रतिनिधी महासंघ, दी पुना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आदी सहभागी होणार आहेत. या वेळी पुना मोटार गुड्स ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष राम कदम, माजी अध्यक्ष प्रकाश, गवळी, पुणे लक्झरी बस ओनर्स असोसिएशनचे बाळासाहेब खेडेकर, राजेंद्र रजपूत, राजन जुनवणे, पुणे मालवाहतूक अध्यक्ष चंद्रकांत दरपळे उपस्थित होते.










