नगर - सध्या दुष्काळाचे सावट असून, चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चारा टंचाई दूर होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कमी पाण्यात येणा...
नगर - सध्या दुष्काळाचे सावट असून, चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चारा टंचाई दूर होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कमी पाण्यात येणारा चारा निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. हायड्रोपोनिस चारा निर्मितीसाठी शासनाच्या वतीने मिळणारे अनुदान वाढवून मिळाल्यास त्याचा चांगला फायदा शेतकऱ्य़ांना होईल. हे अनुदान वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
राळेगणसिद्धी येथे कृषी विभाग आयोजित हायड्रोपोनिस चारा निर्मितीच्या कार्यशाळेप्रसंगी श्री. हजारे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोर्हाळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, हायड्रोपोनिसचे मार्गदर्शक अनिल कानडे, मोरे, संपतराव उगले, गंगाभाऊ मापारी, संदीप पठारे, हरिदास पवार, दत्तात्रेय पोटे, बाळू फटांगडे, गणपत गावडे, हनुमंत पठारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.










