मदुराई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा मदुराई : अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचे लग्न झाले आणि त्यांनी लग्नासाठी कायदेशीरर...
मदुराई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा
मदुराई : अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचे लग्न झाले आणि त्यांनी लग्नासाठी कायदेशीररीत्या सज्ञान झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत घटस्फोट घेतला नाही तर हा बालविवाह रद्दबातल ठरत नाही, असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला. यामुळे बालविवाह अवैध असला तरी तो झाल्यानंतर कायदेशीर घटस्फोट घेतल्याशिवाय तो रद्दबातल ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिरुनेलवेल्ली कनिष्ठ न्यायालयातून हे प्रकरणी उच्च न्यायालयात आले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने एका महिलेच्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. तिरुनेलवल्ली न्यायालयानुसार १९९५ साली झालेल्या विवाहावेळी याचिकाकर्ती अल्पवयीन होती. त्यामुळे तिचा विवाह आपोआपच रद्दबातल ठरतो. मात्र उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा हा आदेश फेटाळून लावला. यासाठी उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा १९५५ मधील नियमांचा हवाला दिला.










