अहमदनगर - स्त्री भ्रूण हत्येमुळे स्त्री जन्माचे घटते प्रमाण ही सध्याची खूप मोठी समस्या बनलेली आहे. याचे निराकरण करण्यासाठी स्त्री भ्...
अहमदनगर - स्त्री भ्रूण हत्येमुळे स्त्री जन्माचे घटते प्रमाण ही सध्याची खूप मोठी समस्या बनलेली आहे. याचे निराकरण करण्यासाठी स्त्री भ्रूण हत्या रोखून स्त्री जन्माचे स्वागत करायला हवा. त्यासाठी प्रत्येक स्त्रीला आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्यासाठी जि.प.महिला बालकल्याणाच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत आणि बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानासाठी कन्यारत्न उत्सव आयोजित करण्यात येत आहे. आजच्या युगात स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने नव्हे तर त्यांच्याही पुढे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचा वेगळा असा ठसा उमटवत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात समाजातील वेगवेगळ्या भूमिका पार पाडतांना स्त्रीला अजून सक्षम होण्याची गरज आहे असे प्रतिपादन नगर तालुक्यातील अकोळनर येथे दासगणू महाराज मंदिरात आयोजित या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केले.
याप्रसंगी मुख्य कार्य़कारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती नंदा वारे, संदेश कार्ले, शरद झोडगे, गटविकास अधिकारी रेश्मा होजगे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शिवाजी खुडे, पूनम भिंगारदिवे, उज्वला कापसे, नंदा शेंडगे, प्रियंका शेळके, मच्छिंद्र जाधव, ज्ञानदेव जाधव, रेश्मा शिंदे, संजय गारुडकर, प्रियंका शेळके आदि उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त प्रारंभी गावातून मुलींची सजवलेल्या रथातून ढोल ताशाच्या रथात मिरवणूक काढम्यात आली. विविध महनीय व्यक्तींच्या वेशभूषा करुन मुली यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमस्थळी गावात जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेवपावती करुन ती पालकांकडे सुपुर्द करण्यात आली. याशिवाय दोन मुली असलेल्या मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. कन्यारत्न उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्य़क्रम सादर केले. या उत्सवांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रमही राबविण्यात आला.









