अहमदनगर : आमदार अरुण जगताप यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (प्राथमिक सोई सुविधा) केडगावातील रस्त्यांसाठी १ कोटी १४ लाख रुपयां...
अहमदनगर : आमदार अरुण जगताप यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (प्राथमिक सोई सुविधा) केडगावातील रस्त्यांसाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून शाहूनगर, एकनाथनगर परिसरातील रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. त्याचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. केडगावात शासनाच्या निधीतून दोन कोटी रुपयांचे उद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार जगताप यांनी यावेळी केली.
माजी आमदार दादा कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेविका सविता कराळे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, रघुनाथ लोंढे, शशिकांत आठरे, प्रभाकर गुंड, बाबुराव कराळे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, केडगाव पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईन टाकल्यामुळे रस्ते उखडले होते, त्यामुळे रस्त्यांचे काम होणे ही येथील गरज होती. ती ओळखून आमदार अरुण जगताप यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शहरात मूलभूत सोईसुविधेतून ४0 कोटी रुपयांची कामे होणार होती.
'खड्डेमुक्त शहर' ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न होता, मात्र विरोधकांनी सूडभावनेतून चांगल्या कामाला स्थगिती आणली. मात्र ती स्थगिती उठवून शहरात लवकरच ही कामे सुरू होतील. उपमहापौर सुवर्णा कोतकर म्हणाल्या, केडगावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांनी केडगावात पाणी योजना आणली. काम पूर्ण होत आले असून नळजोड देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.










