गेले चाळीस दिवस ख्रिस्ती बांधवांचा उपवासाचा काळ होता. आज शुक्रवार दि.25 रोजी या उपवास समयाचा शेवटचा दिवस. या दिवसाला गुड फ्रायडे असं ...
गेले चाळीस दिवस ख्रिस्ती बांधवांचा उपवासाचा काळ होता. आज शुक्रवार दि.25 रोजी या उपवास समयाचा शेवटचा दिवस. या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं. खरं तर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं गेलं, त्याचा हा स्मरण दिन. तरीही त्याला good म्हणजेच उत्तम शुक्रवार म्हटलं जातं. कारण अखिल जगातील मनुष्यांसाठी, त्यांच्या तारणासाठीचं हे बलिदान होय. त्या काळी ग्रीक, रोमन आणि हिब्रु अशा तीन सत्ताधिशांचे राज्य होते. या सम्राट राज्यातील मंत्री, अधिकारी, पदाधिकारी, अशिक्षित जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आणि राजा हाच देव असा धाक घालून जुलूम करीत होते. आपणही माणूस आहोत. आपल्याला स्वतःचे मत, विचार व अधिकार आहेत. हे जनता जुलमी राजवटीत विसरुन गेले होते. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देऊन, शारीरिक व मानसिक गुलामगिरीतून मोकळं होण्याचा मार्ग येशू सांगत असे. त्याच सोबत चुकीचे वागणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचे काय चुकते हे सुध्दा सांगत असे. तसेच आपण सर्व एकाच पित्याची लेकरे असुन सर्वजण त्या आधी बंधु भगिनी आहोत. सर्वाचा एकच देवपिता आहे. जसा तो तुमचा तसाच माझाही आहे. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे. एकमेकांस क्षमा केली पाहिजे. दीन-दुबळे, अपंग, अनाथ, विधवा यांची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाचे जगणे कृतिशील असले पाहिज. भंपक कथा, कर्मकांड यांच्या नादी न लागता, स्वतःमधला आणि इतरामध्येही वास करणारा देव ओळखला पाहिजे असे शिकवित असे. लोक मोठ्या संख्येने त्याच्या मागे फिरत होते. मांडलीक राजे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना भिती वाटली की, न जाणो लोक येशूलाच आपला राजा घोषित करतील म्हणून राजाच्या विरुध्द लोकांना सांगतो या कारणावरुन देशद्रोहाचा आरोप त्याच्यावर लावून मुख्य न्यायधिशाकडे त्याला नेण्यात आले. न्यायाधिशाने त्यास दोषी न ठरविता सोडून दिले. परंतु ज्यांनी त्यास धरुन नेलने त्यांनी यास आमच्या स्वाधिन करा अशे म्हणून मोठा गदारोळ केला. त्यामुळे न्यायाधिश व तत्कालीन पंतप्रधान यांनी अंग काढून घेतले. परिणामी ज्यांनी त्यास धरले त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. येशू हा स्वर्गीय गोष्टींचा राजा होता. पृथ्वीवरील राजेपण त्याला नकोच होते. ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले त्यांना हे कळले नाही. म्हणून येशू वधस्तंभावरुन म्हणाला हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्याना समजत नाही.










