नगर - दुष्काळी परिस्थितीत तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. कृषी विभागामार्फत कमी पाण्यात सकस हिरवा चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिस प...
नगर - दुष्काळी परिस्थितीत तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. कृषी विभागामार्फत कमी पाण्यात सकस हिरवा चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिस पद्धतीने चारा उत्पादनासाठी रु. 6,000 प्रति युनिट अनुदान दिले जात आहे. या योजनेस शेतकऱ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका हायड्रोपोनिस युनिटमधून प्रति दिवस एक टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अतिशय कमी पणी व मजूर या शेतकर्यांच्या दृष्टीने फायद्याच्या बाबी आहेत. उत्पादित झालेला हिरवा चारा खूपच रूचकर व सकस असून, हा चारा जनावरे अतिशय आवडीने खातात. त्यामुळे गायींचे दूध देण्याचे प्रमाण वाढत आहे. नगर तालुक्यास 140 हायड्रोपोनिक युनिट निर्मितीचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांनी स्वयस्फूर्तीने हायड्रोपोनिक युनिटची उभारणी केली आहे. नुकतीच हायड्रोपोनिस चाऱ्याच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील गावागावांतून हायड्रोपोनिस दिंडी नियोजन करण्यात आले होते. त्याचा चांगला फायदा झाला. शेतकर्यांनी हायड्रोपोनिस पद्धतीने चारा उत्पादन सुरू केले.
पिंपळगाव वाघा येथील शेतकरी गोरख वाघ यांनी बंदिस्त शेळीपालन प्रकल्प राबविला असून, सहा हायड्रोपोनिक युनिटची उभारणी केली आहे. सदर प्रकल्पास श्री. भाऊसाहेब बऱ्हाटे, श्री. सुधाकर बोराळे, बाळासाहेब नितनवरे, सरपंच कोल्हे यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.










