नगर- सध्याचे वेगवान युगात अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असल्याने सर्वांनी आपली सुरक्षा वाढीस लावण्यासाठी सुरक्षततेचे नियम पाळल्यास...
नगर- सध्याचे वेगवान युगात अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असल्याने सर्वांनी आपली सुरक्षा वाढीस लावण्यासाठी सुरक्षततेचे नियम पाळल्यास व त्या विषयी उपकरणे वापरल्यास अपघाताच्या प्रमाणात निश्चितच मोठी घट होईल. भविष्यातील आपल्या जीवनातील धोकेही टळतील, असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक संदिप लोंढे यांनी केले. एल ऍण्ड टी कंपनीच्यावतीने 45 व्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जॉ.जन. मॅनेजर अरविंद पारगांवकर, जॉ.जन.मॅनेजर (गुणवत्ता) संदिप महाजन, मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. सुरक्षा विभागाचे प्रमुख शैलेंद्रे भालेकर यांनी प्रास्तविक करुन सर्वांचे स्वागत केले. नागेशचंद्र आढाव यांनी सुरक्षा विषयक आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. सप्ताहात सुरक्षिततेची शपथ, निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, उपकरणांचा वापर व प्रदर्शन,फस्टएड विषयी माहिती व प्रशिक्षण, स्लाईड शो, हेल्मेट विषयक जनजागृती रॅली , प्रश्नमंजुषा व व्याख्याने इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले व यात सर्वांनी मोठा सहभाग नोंदविला याबद्दल सर्वांचे आभार मानले.










