वन विभागाची कसरत : ४५ तासांनंतर बिबट्या रोपवाटिकेत तब्बल ४0 फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला ४५...
वन विभागाची कसरत : ४५ तासांनंतर बिबट्या रोपवाटिकेत
तब्बल ४0 फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला ४५ तासांनंतर यश आले. विहिरीत ठेवलेल्या पिंजर्यात वन विभागाने मांस ठेवल्याने बिबट्या अलगत पिंजर्यात अडकला. सोमवारी सकाळी त्याला विहिरीतून बाहेर काढून डिग्रस येथील रोपवाटिकेत सोडण्यात आले.
शनिवारी पहाटे सहा महिन्यांचा हा बिबट्या देवळाली प्रवरा येथील सुभाष थोरात यांच्या तब्बल ४0 फूट विहिरीत पडला होता. शनिवार व रविवारी असे दोन दिवस वन विभागाने बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याला अपयश आले. रविवारी क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडताना रोप तुटल्याने वन विभागाचे दोन कर्मचारीही जखमी झाले.
बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडण्याचा प्रयत्न झाला. अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारले. परंतु विहिरीतील कपारीत बसलेला बिबट्या बाहेर निघत नव्हता. अखेर कंटाळून रविवारी वन विभागाने ही मोहीम थांबवली. रात्री पिंजर्यात मांस ठेवून वन विभाग निघून गेला. दोन दिवस भूकेने व्याकूळ बिबट्या मांसाच्या दिशेने आला अन् पिंजर्यात अलगद अडकला. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले, तर पिंजर्यात बिबट्या आढळला. त्यामुळे पुन्हा विहिरीवर गर्दी झाली. वन खात्याच्या अधिकार्यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार वन खात्याचे महेश ससे, खराडे, झावरे, वाबळे, कोहकडे हे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत दावे सोडून पिंजरा वर ओढण्यात आला. त्यावेळी बिबट्या पिंजर्यातून डरकाळ्या फोडत होता. दरम्यान, बिबट्याला वर काढण्यात वन विभागाला सौरभ मुसमाडे, निलेश मुसमाडे, राहुल म्हसे, दीपक भांड,
प्रवीण थोरात, अमोल मुसमाडे, अमित मुसमाडे यांनी मदत केली.










