मुंबई :दि 23 मार्च रोजी म्हणजेच येत्या बुधवारी होळी पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून, ते भारतातून दिसणार असल्याची म...
मुंबई :दि 23 मार्च रोजी म्हणजेच येत्या बुधवारी होळी पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण होणार असून, ते भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जातो. अशावेळी पौर्णिमेचा नेहमी तेजस्वी दिसणारा चंद्र कमी तेजस्वी दिसतो अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
बुधवार, २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. परंतु त्या वेळी चंद्र आकाशात असणार नाही. सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. मुंबईतून चंद्र सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी ग्रहणातच उगवलेला दिसेल. संपूर्ण भारतात चंद्रोदयापासून सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही म्हणतात. अशा ग्रहणात ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम पाळवयाचे नसतात. त्यामुळे त्या दिवशी होळी पौर्णिमा नेहमीप्रमाणोच साजरी करता येईल, मात्र या वर्षी पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे सुकी होळी पाण्याचा वापर न करता साजरी करावी, असे आवाहनही सोमण यांनी केले. तसेच होळीचा आनंद साजरा करताना रासायनिक रंगांचा वापर करू नये, असेही त्यांनी सांगितले.










